Tuesday 16 May 2017

इथे ‘आत्महत्येस’ही लाईक मिळतात.


‘ढोलताशे’ या मराठी चित्रपटाचे निर्माते अतुल तपकीर यांनी चित्रपटाचे अपयश आणि कौटुंबिक संघर्षामुळे आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी तपकीर यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर याविषयी सविस्तर माहिती दिली. आश्चऱ्याची गोष्ट म्हणजे ‘आणि म्हणून मी विष घेऊन आत्महत्या करत आहे’ या त्याच्या फेसबुक पोस्ट ला अनेक मित्रांचे ‘लाईक्स’ सुद्धा मिळाले आहेत. केवढी मोठी ही शोकांतिका! यावरून आभाशी जग खरोखर किती आभाशी आहे याची जाणीव होते. आपल्या खऱ्याखुऱ्या नात्यांना प्रसंगी तिलांजली देऊन आभाशी दुनियाच खरी दुनिया आहे असा अनेकांचा भ्रम होत आहे. प्रत्येक जण संध्या फेसबुक, व्हाट्सअॅप ट्विटर अशा सामाजिक माध्यमांचा वापर अगदी डोळेझाक करत आहे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. सामाजिक माध्यमावर रोज प्रचंड प्रमाणात माहितीची ढकलाढकली चालू असते आणि यामध्ये व्हाट्सअॅप वर तर कहरच होत आहे. कोणतीही माहिती न वाचता ती पुढे ढकलली जाते आहे. राजकीय सुडापोटी उगाच कुणाच्या फोटोला एडिट करून वेगवेगळ्या ग्रुप्सवर फिरवले जाते आणि अशा प्रकारचा हलगर्जीपणा एक दिवस आपल्याला धोक्यातही आणू शकतो. सामाजिक माध्यमांवर एखादी चुकीची पोस्ट करणे जशा गुन्हा आहे तितकाच गुन्हा त्या पोस्ट ला लाईक करणे हा सुद्धा आहे. अतुल तपकीर यांच्या पोस्ट ला लाईक करणाऱ्यांनी नक्कीच ती वाचली नसेल कारण आत्महत्या करणाऱ्यांना कुणीच प्रोत्साहित करणार नाही. सामाजिक माध्यमांचा वापर आजच्या काळात तरी टाळणे अशक्य असला तरी तरुणांनी त्याच्या जास्त आहारी न जाण्यातच शहाणपणा आहे. सोशल माध्यमे ही जागतिक व्यासपीठ आहेत त्यामुळे तिथे व्यक्त होतांना भान असणे अत्यंत आवश्यक आहे.