Showing posts with label Marathi Articles. Show all posts
Showing posts with label Marathi Articles. Show all posts

Friday 2 October 2020

युट्युबर व्हा, करिअर घडवा.

 
 
मित्रांनो आज मी ज्या वळणावर आहे तो केवळ तुमच्यामुळे, तुम्ही आहात म्हणून मी आहे. मी एक खेडेगावातील तरुण आहे. खेडेगाव म्हटले कि एक चित्र आपल्या डोळ्यासमोर उभे राहते ते म्हणजे अशिक्षित लोकांचा समूह होय मी देखील याच समूहातला आहे. जेंव्हा एखादी शासकीय योजना गावासाठी येते त्यावेळी त्या योजनेची माहिती प्रत्येक नागरिकांना होईलच असे नाही परंतु सोशल मिडीयाच्या माध्यमातून ती माहिती लोकांपर्यंत पोहचविली तर नक्कीच नागरिक ती माहिती वाचतात आणि त्यांना शासकीय योजनेची माहिती मिळते.शेतकऱ्यांसाठी बऱ्याच शासकीय योजना असतात परंतु त्या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचत नाही, मी देखील शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी बराच प्रयत्न केला पण केवळ माहिती न मिळाल्यामुळे मला काही योजनांच लाभ घेता आला नाही आणि या गोष्टीची सल सारखी मनाला टोचत होती कि आपण एवढे शिकलो (B.com) असून देखील आपण एखाद्या योजनेचा लाभ घेऊ शकत नसेल तर मग गावातील नागरिकांचे काय हाल आहेत. 

 

मी एका खाजगी ठिकाणी नोकरी करत असल्यामुळे मला हे काम करण्यासाठी वेळ मिळत नसे मग मी फावल्या वेळेत हि सर्व माहिती शोधून ती फेसबुक आणि व्हॉट्सअप या समाजमाध्यमांवर शेअर असे परंतु नंतर माझ्या लक्षात आले कि या गोष्टीला आकार देणे गरजेचे आहे. मग मी माझे युट्युब चॅनल सुरु करण्याचे ठरविले आणि मग सर्व शासकीय योजनांची माहिती असो किंवा नोकरीची माहिती असो किंवा इतर महत्त्वाची माहिती असो मी ती व्हिडीओद्वारे माझ्या युट्युब चॅनलवर प्रकाशित करू लागलो. खाजगी नोकरी करत असल्यामुळे त्यावेळेस या सर्व गोष्टींना वेळ मिळत नव्हता परंतु रात्रीच्या वेळत किंवा सुट्टीच्या दिवशी जमेल तसे माहितीचे व्हिडीओज मी माझ्या डिजिटल डीजी या युट्युब चॅनलवर प्रकाशित करत राहत होतो त्यानंतर मला माहिती मिळाली कि युट्युबद्वारे आपण पैसे देखील कमावू शकतो.
 
    

युट्युबच्या व्हिडीओमुळे पैसे मिळतात हे मला २०१८ या वर्षामध्ये माहिती पडले आणि मग मी ती सर्व प्रक्रिया समजावून घेतली. युट्युब मॉनिटाइजेशन ॲडसेंस ॲप्रोव्हल मिळविण्यासाठी गुगलकडे ॲडसेंसकडे अर्ज करावा लागतो आणि मग गुगलकडे ॲडसेंस ती सर्व माहिती तपासून मान्यता देतात.  मी दोन वेळेस ॲडसेंस ॲप्रोव्हलसाठी अर्ज केला पण माझा अर्ज नाकारला गेला मात्र तिसऱ्या वेळेस माझा अर्ज मंजूर झाला आणि माझ्या युट्युब चॅनलला पैसे कमविण्याची संधी निर्माण झाली. खाजगी नोकरी करत असल्यामुळे मला व्हिडीओ तयार करण्यास वेळच मिळाला नाही त्यामुळे युट्युबला पाहिजे तेवढा वेळ मी देऊ शकलो नाही. मला लिखाणाची देखील आवड होती आणि अजूनही आहे. मी २०१४ मध्ये गुगल ब्लॉगस्पॉट वर एक मोफत ब्लॉग निर्माण करून माझ्या सोशल मिडियावरील लेखनाचा श्रीगणेशा केला होता आणि त्यावर 200 ते 300 ओळीपर्यंत कंटेंट लिहायला सुरुवात केली पण या मोफत उपलब्ध असलेल्या ब्लॉगलाखूपच कमी प्रतिसाद मिळत होता. पुन्हा मझ्या असे लक्षात आले कि स्वतःचे डोमेन नेम खरेदी करून जर वर्डप्रेसवर या सी एम एस वर ब्लॉग बनविला तर ब्लॉगला SEO ( Search Engine Optimization ) करून ranking करता येईल मग मी डिजिटल डीजी हा माझा ब्लॉग बनविला परंतु SEO हा विषय खूप मोठा असल्यामुळे मला ते काही जमले नाही परंतु म्हणतात ना चालायला लागले कि रस्ता आपोआप सापडतो त्याच प्रमाणे मला वेबसाईट संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी औरंगाबाद येथील माझे एक स्नेही यांनी खूप मदत केली. ब्लॉग आणि युट्युब चॅनल दोन्ही माझे सुरु होते परंतु त्याकडे मी कधी करिअर म्हणून बघितलेच नाही. सोशल मिडियामुळे अमेरिकेची सत्ता बदलली...ज्या सोशल मीडियाचा प्रभावी उपयोग केल्यास सत्ता बदलू शकते हे भारताने २०१४ च्या निवडणुकीत बघितले... फ्रान्समधील, यलो वेस्ट चळवळ (yellow vest movement) हा सोशल मिडीयाचाच भाग होता. एवढे असतांनाही जर तुम्ही सोशल मीडियाकडे करिअर म्हणून बघत नसाल तर मला वाटते सोशल मिडीयाच्या खूप मोठ्या संधीस आपण मुकत आहोत.

वैयक्तिक कारणामुळे जुलै २०२० मध्ये मला नोकरी सोडण्याची वेळ आली आणि आता पुढे काय असा प्रश्न निर्माण झाला, याच काळामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात चालू होता ( जो कि सध्या देखील सुरु आहे) नोकरी नाही, उद्योग धंदा नाही, नजरेपुढे अगदी गडद अंधार होता पण म्हणतात ना गरज हो शोधाची जननी आहे आणि गरज निर्माण झाली कि माणूस कोणताही शोध लावू शकतो. खाजगी नोकरी करत असल्यामुळे युट्युब आणि वेबसाईट(ब्लॉग) हे अडगळीत पडलेले होते, त्यालाच मी उत्पन्नाचे साधन बनविण्याचे ठरविले आणि असेही हाताला काही काम नसल्यामुळे संपूर्ण वेळ मी युट्युब चॅनलवर काम करण्याचे ठरविले. मी सातत्याने युट्युबवर सतत काम करत होतो माझ्या युट्युब चॅनलवरील व्हिडीओज मुळे अनेकांना फायदा होत आहे आणि यामुळे लोकांना माझ्या युट्युब चॅनलवरील व्हिडीओ आवडायला लागले. इंटरनेटवर कधीही काहीही होऊ शकते. या विचाराशी मी पूर्णपणे सहमत आहे. मी शेतकऱ्यांच्या विविध योजनासंबधी माहिती देण्यास सुरुवात केली आणि माझे सबस्क्रायबर व पैसा दोन्ही वाढायला लागले आहेत. आज नोकरी नसतांना आणि पैशांची अत्यंत गरज असतांना २० ते २५ हजार प्रती महिना कमावत आहे आणि हि नक्कीच माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे आणि बोनसमध्ये समाधान मिळते ते वेगळेच.

तरुण मित्रांना मला एवढेच सांगायचे आहे कि नोकरी नसेल तर निराश होऊ नका. समाजमाध्यमांमध्ये तुम्ही तुमचे करिअर घडवू शकतात,तुमच्यामध्ये काही कौशल्य असेल तर ते लोकांसमोर मांडून तर बघा यश नक्की मिळेलच. मी खेडेगावातील आहे, ते माझे कामच नाही, माझ्याकडून होईल का? हा न्यूनगंड मनातून आधी काढून टाका, स्वतःवर विश्वास ठेवायला शिका आणि अपयशाची भीती न बाळगता तुमच्या कामात सातत्य ठेवा  समोर मग बघा विजय तुमचाच आहे. सुरुवातीला तुम्ही अडखळाल, लोकं तुम्हाला हसतील, मात्र तुम्ही ठाम राहा, अगदी त्या विशाल पर्वतासारखे जो उन वारा पाउस यांची कसलीही चिंता न करता अगदी कणखर पणे उभा असतो. तुम्ही देखील तसेच व्हा अगदी ठाम विशाल पर्वतासारखे अगदी विशाल!


Tuesday 29 September 2020

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु

 

 मित्रांनो नमस्कार, शेतकरी म्हटला कि अनंत अडचणीचा डोंगर असे चित्र आपल्याडोळ्यासमोर उभे राहते. मोठ्या कष्टाने हाती आलेले पिक जागविण्यासाठी लोडशेडिंग मुळे झोपेला फाटा देऊन अंधारामध्ये रात्रीच्या दोन दोन वाजता शेताला पाणी देण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत आहे. तर हि कुचंबना थांबविण्यासाठी आता तुम्ही तुमच्या शेतातील विहिरीवर सौर उर्जेवर आधारित सौर पंप लावू शकता आणि दिवसा शेताला पाणी देऊन रात्री अगदी निवांत आराम करू शकता ना लाईटचे टेन्शन ना लोडशेडिंगची चिंता. मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेअंतर्गत तुम्ही सौर कृषी पंप योजनेसाठी अर्ज करू शकता.. या संदर्भातील बातमी दैनिक लोकमत वृत्तपत्रात प्रकाशित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री सौर कृषी पंप या योजनेसाठी  कसा करतात हे मी आजच्या व्हिडीओमध्ये पत्यक्ष उदाहरणासहित सांगणार आहे..

मुख्यमंत्री सौर कृषी पंप या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याअगोदर हि योजना कोणत्या शेतकऱ्यांसाठी आहे..यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात..या योजनेच्या लेटेस्ट GR मध्ये काय लिहिले आहे हि माहिती तुम्हाला असणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेसंदर्भात माहितीची pdf फाईल व याच योजनेचा लेटेस्ट GR www.digitaldg.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे. तुम्ही हि माहिती तुमच्या मोबाईलमध्ये एका क्लिकवर डाउनलोड करू शकता..त्यासाठी गुगलमध्ये टाईप करा. digitaldg.in त्यानंतर हि वेबसाईट ओपन होईल या वेबसाईटवरील इंग्लिश आर्टिकल या बटनावर क्लिक करा...त्यानंतर  Maharashtra solar pump yojna online application या लिंकवर क्लिक करा..त्यानंतर पेजला थोडे खाली स्क्रोल करा. या ठिकाणी मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना pdf अशी लिंक दिसेल त्यावर क्लिक करा..या लिंकवर क्लिक करताच मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेविषयी माहिती असलेली pdf फाईल तुमच्या कॉम्प्युटर किंवा मोबाईलमध्ये डाउनलोड होईल...हि सर्व माहिती सविस्तर वाचून घ्या.

त्यानंतर याच ठिकाणी मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचा लेटेस्ट GR उपलब्ध आहे तो तेखील तुम्ही एका क्लिक मध्ये तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करू शकता त्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना pdf अशी लिंक दिसेल त्यावर क्लिक करा..या लिंकवर क्लिक करताच मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेविषयी असलेला gr तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होईल तो देखील तुम्ही सविस्तर वाचू शकता...

चला तर मित्रांनो आता थोडाही वेळ न दवडता जाणून घेवूयात कि मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेसाठी ऑनलाईन’ अर्ज कसा करतात.

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेच ऑनलाईन फॉर्म भरण्यास सुरुवात करण्याअगोदर तुमच्या जमिनीचा सातबारा उतारा..आधार कार्ड अर्जदार sc किंवा st जातीचे प्रमाणपत्र ह्या सर्व कागदपत्रांची स्कॅन केलेल्या फाईल्स तुमच्याकडे उपलब्ध असणे आवश्यक आहे कारण अर्ज भरतांना या सर्व फाईल्स तुम्हाला या ठिकाणी अपलोड कराव्या लागतील.

त्याच प्रमाणे ज्या ठिकाणी तुम्ही हा सौर पंप इंस्टाल करणार आहात म्हणजेच बसविणार आहात त्या जागेच्या जवळ एखादी विहीर असेल तर जवळचा महावितरण ग्राहक क्रमांक हा फॉर्म भरताना तुम्हाला आवश्यक आहे त्यासाठी अगोदरच शेजारच्या विहिरीसाठी किंवा बोरसाठी विद्युत कनेक्शन घेतले असेल तर त्यांचा ग्राहक क्रमांक नोंद करून घ्या..

Saturday 7 March 2020

मुलींच्या कमतरतेमुळे 'बायको मिळेना लग्न जुळेना' परिस्थिती.


मुलगा म्हणजे वंशाचा दिवा आणि मुलगी म्हणजे परक्याचे धन ह्या वृत्तीला आज आपल्याला कायमची मूठमाती देण्याची गरज निर्माण झाली आहे. मागील काही वर्षापूर्वी केलेल्या अमाप स्त्री अर्भक गर्भपातामुळे समाजामध्ये मोठ्या प्रमाणात स्त्री पुरुष प्रजनन संबधी असंतुलन निर्माण झाले आहे. मुले जास्त आणि मुलींची संख्या कमी असल्यामुळे अनेक तरुणांना लग्नासाठी ‘बायको मिळेना लग्न जुळेना’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि याचे परिणाम आजच्या तरुणांना भोगावे लागत आहे. महिलांनी प्रत्येक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली आहे अमाप क्षमता, कौशल्य व ज्ञान स्त्रियांजवळ असते यात तिळमात्र शंका नाही तरी देखील स्त्रियांना पूर्णपणे न्याय मिळाला आहे का? या प्रश्नांचे उत्तर नक्कीच हो असे आज तरी देता येणार नाही. शिक्षण क्षेत्रामध्ये शिकण्यासाठी जितक्या संधी मुलांना मिळतात तितक्याच संधी जर मुलींना मिळाल्या तर नक्कीच त्या त्यांचे अस्तित्व अधोरेखित करू शकतील ग्रामीण भागामध्ये काही अपवाद वगळला तर अजूनही मुलींना दहावी किंवा बारावीच्या पुढे शिक्षण घेण्याची संधी मिळत नाही. बारावीचे शिक्षण झाले म्हणजे वडिलांना तिचे हात पिवळे करण्याची घाई असते किंबहुना मुलगी हि एक जबाबदारी आहे लग्न झाले म्हणजे आपली जबाबदारी संपली असे मुलींच्या पालकांना वाटते असे म्हटल्यास अतिशोयोक्ती ठरणार नाही. केवळ महिला दिनाच्या एका दिवसासाठी नव्हे तर कायमचा मुलींना व महिलांना सम्मान आणि समानसंधी देण्याची गरज निर्माण झाली आहे.

Wednesday 29 November 2017

खेड्यातील अवलिया तरुण करणार एड्सवर जाणीव जागृती


१ डिसेंबर हा जागतिक एड्स विरोधी दिन म्हणून जगभर साजरा करण्यात येतो. एड्स हा विषयच खूप मोठा आहे, एरवी पुण्यतिथी जयंत्या मोठ्या प्रमाणात साजऱ्या करणाऱ्या या देशात एड्स रोगाविषयी खूप कमी प्रमाणात बोलले जाते. मागील काही वर्षामध्ये एड्स रोगाविषयी तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणावर जाणीव जागृती होत आहे ही बाब आशादायक आणि स्वागताहार्य आहे. ग्रामीण भागामाध्ये तर लैंगिक विषयावर बोलणेच अस्पृश्य ठरवले जाते त्यामुळे एड्स सारख्या जीवघेण्या रोगाविषयी ग्रामीण नागरिकांना माहिती देणे खूपच कठीण होऊन जाते आणि हीच बाब अधोरेखित करून भोकरदन तालुक्यातील कोळेगाव येथील युवक दादाराव गावंडे पुढे सरसावला आहे. सध्या जवळपास प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहेत त्यामुळे व्हाट्सअप फेसबुक, युट्यूबचा वापरही मोठ्या प्रमाणात होत आहे आणि याच सामाजिक माध्यमांचा उपयोग करून एड्स रोगाविषयी ग्रामीण युवकांमध्ये लघुपटाद्वारेमाहितीचा प्रसार करण्याचा दादाराव गावंडे या तरुणाचा मानस आहे. युट्यूब वर डीजीटल डीजी आणि रुरल टीव्ही असे दोन चॅनल्स हा तरुण चालवत आहे. वेगवेगळ्या शासकीय योजनेसाठी अर्ज कसे करावेत यासंदर्भात व्हिडिओद्वारे नागरिकांना मार्गदर्शन करण्याचे काम निरंतर हा तरुण करत आहे. किंवा गावामध्ये काही समस्या असेल तर त्या संदर्भात संबधित व्यक्तीची मुलाखत घेऊन ती समस्या सर्व गावकऱ्यांच्या समोर मांडून त्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले जातात. आपण ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजाचे आपणासही काही देणे लागते याच भावनेतून आता एड्स रोगाविषयी १ डिसेंबर या जागतिक एड्स विरोधी दिनाच्या दिवशी गावातीलच काही तरुणांच्या मदतीने लघुपट निर्मितीची सुरुवात होत आहे. एड्स विषयी तरुणांच्या मनात थोडी देखील जागृती झाली तरी या लघुपटाचे हे खूप मोठे यश असेल यात तीळमात्र शंका नाही.

Saturday 28 October 2017

कोळेगावकरांचा 'सोशल कट्टा'

सध्या सोशल मिडियाचे युग आहे असे म्हटल्यास अतिशोयोक्ती ठरणार नाही व्हाट्सअप, फेसबुक, ट्वीटर, गुगल प्लस, युट्युब इत्यादी समाजमाध्यमांवर लोक बराच वेळ टेहळतांना दिसतात, परंतु भोकरदन तालुक्यातील कोळेगाव येथील युवकांनी व्हाट्सअप या समाजमाध्यमालाच चर्चेचे व्यासपीठ बनविले आहे. दोन तीन दिवसामिळून सर्वांच्या चर्चेतून एक विषय निवडला जातो आणि त्यावर संध्याकाळी चर्चा केली जाते. ‘मी फक्त कोळेगावकर’ असे या व्हाट्सअप ग्रुपचे नाव असून सत्ताधारी ते विरोधक सार्वजन चर्चेत भाग घेतात आणि त्यावर चर्चा करतात. काही कारणास्तव बाहेरगावी असलेल्या कोळेगावकरनाही या सोशल माध्यमांवरील चर्चेमध्ये सहभागी होता येते, यामुळे गावातील समस्यावर काही प्रमाणात का होईना तोडगा काढण्याचा प्रयत्न याठिकाणी केला जातो आहे यामध्ये तिळमात्र शंका नाही. सोशल मिडियाचे नकारात्मक परिणाम डोके वर काढत असताना कोळेगावकरानी चर्चेसाठी अवलंबलेले हे मध्यम सध्या सर्व गावकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. सोशल माध्यमांचा योग्य उपयोग केला तर ते शाप नसून वरदानच ठरत असल्याचे उदाहरण या ठिकाणी पहावयास मिळत आहे.

Wednesday 23 August 2017

कोळेगाव येथे पाडवा उत्साहात साजरा.

भोकरदन तालुक्यातील कोळेगाव येथे सालाबादप्रमाणे याही वर्षी पाडवा सन उत्साहात साजरा करण्यात आला. कोळेगाव आणि कोळेगाव पंचक्रोशीतील हौशी तरुणांच्या कला गुणांना वाव मिळावा हा या कुस्ती स्पर्धेच्या आयोजनाचा हेतू होता, कोळेगाव येथील जागृत संस्थान श्री भैरवनाथ महाराज मंदिर परिसरामध्ये एक दिवस आगोदर गावातील तरुणांनी कुस्ती स्पर्धेसाठी सुसज्ज आखाड्याची तयारी केली . स्पर्धेत स्पर्धेतील विजयी मल्लांना प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून ५१ ते १००० रुपयापर्यंत बक्षिसे वाटप करण्यात आले. कुस्तीस्पर्धे विषयी सोशल मिडीयावर नियोजनबद्ध केलेल्या प्रचार आणि प्रसारामुळे सदरील कुस्ती स्पर्धेविषयी तरुणांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली होती आणि त्याचाच परिमाण  असा दिसून आला की दरवर्षीपेक्षा ह्या वर्षी प्रेक्षकांची संख्येत खूप वाढ झाली. गावकऱ्यांचे योग्य नियोजन, सुसज्ज आखाडा,कुस्तीस्पर्धेसाठी केलेला सोशल मीडियाचा वापर आणि प्रेक्षकांच्या प्रचंड   उत्साहामुळे हा कार्यक्रम यशस्वी ठरला आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भैरवनाथ संस्थांनचे अध्यक्ष सांडू साहेब, पुंडलिकराव गावंडे, पंडित गावंडे, डॉ. ईश्वर वाघ, गजानन पाटील गावंडे, भागवत गावंडे, रामेश्वर गावंडे, समाधान गावंडे, आदींनी परिश्रम घेतले.

Sunday 30 July 2017

विकासाची रिबीन आणि कात्री.

सिल्लोड येथे दिनांक २९ जुलै रोजी केंद्रीय दळणवळण व भूपृष्ठ्मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते औरंगाबाद- जळगाव रस्त्याच्या सिमेंटीकरण कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी गडकरी साहेब म्हणाले की सदरील रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर दानवे साहेबांच्या हातात कात्री तर सत्तार साहेबांच्या हातात रिबीन असेल. किती क्रांतीकारी विचार आहेत हे. शेजारचा चीन डुरक्या फोडतोय तर पाकिस्तान वाकुल्या दाखवतोय अशा परिस्थितीमध्ये देशामध्ये राजकीय पातळीवरून एकात्मतेचे प्रदर्शन होणे आवश्यक आहे. कारण कार्यकर्त्यांवर किंबहुना जनतेवर आपले लोकप्रतिनिधी कसे वागतात ह्याचा खूप मोठा परिणाम होत असतो त्यामुळे विकास कामामध्ये खरोखरच जर राजकारणाला दूर ठेवले तर डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांचे २०२० पर्यंत भारत महासत्ता होण्याचे स्वप्न पूर्ण झालेच म्हणून समजा. इंग्रजांनी हेच केले होते फोडा आणि राज्य करा आणि पुन्हा सर्वाना एकत्र होण्यासाठी कित्येकांचे बळी गेले कित्येक दिवस वाट बघावी लागली आणि नंतर स्वातंत्र्य मिळाले त्यामुळे मिळालेले हे स्वातंत्र्य असेच अबाधित ठेवण्यासाठी किंबहुना देशाची प्रगती करण्यासाठी आज सर्व राजकीय नेत्यांनी किमान विकास कार्यामध्ये तरी राजकीय जोडे बाहेर ठेवून सकारात्मकता ठेवून सहकार्य करण्याची अपेक्षा आहेत. तरच खऱ्या अर्थाने विकास कामांची रिबीन आपण समतेच्या कात्रीने कापू शकू यात तिळमात्र शंका नाही.

Wednesday 21 June 2017

जलयुक्तच्या पाणी उपश्याकडे गावंडेनी वेधले मुख्यमंत्र्यांचे लक्ष.

Guest Author - Bhagwan Palkar ( Reporter daily Deshonnati Marathi newspaper) 


भोकरदन तालुक्यातील कोळेगाव या छोट्याशा गावातील दादाराव गावंडेनी विचारलेल्या प्रश्नाची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून याबद्दल त्यांचे कौतुक केले आहे.
दादाराव गावंडे हे गावाच्या बाबतीत संवेदनशील व्यक्तिमत्व. गावाचा विकास व्हावा यासाठी सतत झटत असतात सोशल मिडीयावर सतत कार्यरत असतात. त्यांचा स्वतःचा ब्लॉग असून युट्यूबवर आहेत. मी मुख्यमंत्री बोलतोय या कार्यक्रमासाठी जनतेकडून प्रश्न विचारण्याचे आवाहन करण्यात आले होते. नुकत्याच पार पडलेल्या कार्यक्रमाचा पाणी हा विषय होता. राज्यातून अठरा हजार इमेल प्राप्त झाले होते. गावामध्ये झालेल्या जलयुक्त शिवारमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी जमा झाले होते. विहिरी नाले तुडुंब भरले त्यामुळे कपाशी अठरा क्विंटलवरून पंचवीस तर गहू वीस क्विंटलवरून अठ्ठावीस गेल्याचा अनुभव त्यांनी सांगितला. पाणी मोठ्या प्रमाणात असले तरी उपसा त्याहीपेक्षा मोठ्या प्रमाणात होत असल्याने लगेच पाण्याचा तुटवडा निर्माण झाला, यावर शासन काय उपाय योजना करणार असा प्रश्न त्यांनी विचारला होता. यावर मुख्यमंत्र्यांनी चांगला प्रश्न विचारल्याबद्दल त्यांचे अभिनंदनकरून पिक आराखड्याबद्दल व पाणी ताळेबंदाविषयीचा निर्णय शासन दोन तीन वर्षात लागू करणार असल्याचे सांगितले.

  खेडेगावातील युवकाने सोशल मिडीयाचा योग्य वापर करून मुख्यमंत्र्यांचे लक्ष जलयुक्त शिवार योजनेचे काम झाल्यानंतर जमा होणाऱ्या पाण्याच्या जलद उपश्याच्या प्रश्नाकडे वेधल्याने मुंबईच्या वर्तमानपत्रांनी याची दखल आवर्जून घेतली आहे. अनेकांनी फोन करून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.सोशल मिडिया ही केवळ शहरवासीयांची मक्तेदारी नसून ग्रामीण युवकही सकारात्मकतेने आपले प्रश्न मांडून कल्पकता दाखवितात हे त्या निमित्ताने समोर आले आहे, यामुळे दादाराव गावंडे यांचे तालुक्यात कौतुक होत आहे.

Tuesday 16 May 2017

इथे ‘आत्महत्येस’ही लाईक मिळतात.


‘ढोलताशे’ या मराठी चित्रपटाचे निर्माते अतुल तपकीर यांनी चित्रपटाचे अपयश आणि कौटुंबिक संघर्षामुळे आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी तपकीर यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर याविषयी सविस्तर माहिती दिली. आश्चऱ्याची गोष्ट म्हणजे ‘आणि म्हणून मी विष घेऊन आत्महत्या करत आहे’ या त्याच्या फेसबुक पोस्ट ला अनेक मित्रांचे ‘लाईक्स’ सुद्धा मिळाले आहेत. केवढी मोठी ही शोकांतिका! यावरून आभाशी जग खरोखर किती आभाशी आहे याची जाणीव होते. आपल्या खऱ्याखुऱ्या नात्यांना प्रसंगी तिलांजली देऊन आभाशी दुनियाच खरी दुनिया आहे असा अनेकांचा भ्रम होत आहे. प्रत्येक जण संध्या फेसबुक, व्हाट्सअॅप ट्विटर अशा सामाजिक माध्यमांचा वापर अगदी डोळेझाक करत आहे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. सामाजिक माध्यमावर रोज प्रचंड प्रमाणात माहितीची ढकलाढकली चालू असते आणि यामध्ये व्हाट्सअॅप वर तर कहरच होत आहे. कोणतीही माहिती न वाचता ती पुढे ढकलली जाते आहे. राजकीय सुडापोटी उगाच कुणाच्या फोटोला एडिट करून वेगवेगळ्या ग्रुप्सवर फिरवले जाते आणि अशा प्रकारचा हलगर्जीपणा एक दिवस आपल्याला धोक्यातही आणू शकतो. सामाजिक माध्यमांवर एखादी चुकीची पोस्ट करणे जशा गुन्हा आहे तितकाच गुन्हा त्या पोस्ट ला लाईक करणे हा सुद्धा आहे. अतुल तपकीर यांच्या पोस्ट ला लाईक करणाऱ्यांनी नक्कीच ती वाचली नसेल कारण आत्महत्या करणाऱ्यांना कुणीच प्रोत्साहित करणार नाही. सामाजिक माध्यमांचा वापर आजच्या काळात तरी टाळणे अशक्य असला तरी तरुणांनी त्याच्या जास्त आहारी न जाण्यातच शहाणपणा आहे. सोशल माध्यमे ही जागतिक व्यासपीठ आहेत त्यामुळे तिथे व्यक्त होतांना भान असणे अत्यंत आवश्यक आहे. 

Monday 14 November 2016

शेत मालाला योग्य भाव हवा.


सततचा पडणारा दुष्काळ, अतिवृष्टी यामुळे शेतकरी कायम चिंताग्रस्त असतो पण चालू वर्षी पाऊस चांगला झाल्यामुळे शेतकरी वर्गात कमालीचा आनंद व्यक्त होत आहे. निसर्गाने या वर्षी साथ दिल्यामुळे शेतकऱ्यांचा मालाचे उत्पादन वाढणार आहे. कपाशी, मक्का, सोयाबीन, तूर आदी पिके मोठ्या कष्टाने शेतकऱ्याने जोपासले आहे. शासनाने शेतकऱ्याच्या मालास योग्य भाव दिल्यास तेंव्हाच खऱ्या अर्थाने मेहनतीचे चीज होईल असे म्हणता येईल. शेती हा आपल्या अर्थव्यवस्थेचा काणा आहे, कोणताही राजकीय पक्ष असो त्या पक्षाचे नेते निवडणुकीच्या काळात शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव वाढवून देऊ अशी आश्वासने देऊन निवडून येतात आणि सत्ता आली की त्यांना त्यांच्या आश्वासनांचा विसर पडतो. शेतकऱ्यांची केवळ अनुदानावर बोळवण न करता शेतीसाठी ठोस उपाय योजना  करून शेतकऱ्यांसाठी विविध योजना अंमलात आणाव्यात त्याचप्रमाणे शासकीय स्तरावर शेतीविषयक विविध चर्चासत्रे, प्रात्याक्षिके, कार्यशाळा असे कार्यक्रम आयोजित करून राबविल्यास सदैव आर्थिक विवंचनेत गुंतत चाललेला शेतकरी खऱ्या अर्थाने उभारी घेऊ शकेल यात शंका नाही. 
( या लेखामध्ये संदर्भासाठी दिनांक १४ नोव्हेंबर २०१६ रोजी प्रकाशित झालेल्या दैनिक सकाळ वृत्तपत्रातील औरंगाबाद टुडे या पुरवणीतील कात्रणाचा उपयोग केला आहे) 

Saturday 8 October 2016

शंकेखोर प्रवृत्तीचे सर्जिकल व्हावे..!

भारतीय लष्कराने केलेली सर्जिकल स्ट्राईक्सची कृती अपरिहार्य आणि अनिवार्य होती पाकिस्तानच्या मुजोरीचा तो एकप्रकारे मुहतोड जवाब होता. याबाबत सध्या भारतामध्ये राजकीय वादळ निर्माण होत आहे, अशा मुद्द्यावर बोलताना राजकीय नेत्यांनी थोडे तारतम्य बाळगायला हवे. राजकीय कंडू शमविण्यासाठी सर्जिकल स्ट्राईक बाबत पुरावे मागून लष्करालाच खोटे ठरविणे ही मनोवृत्ती भारतीय लष्कराच्या निष्ठा व विश्वासहर्तेला सुरुंग लावणारी आहे. आंतरराष्ट्रीय राजकारण, आंतरराष्ट्रीय संबध, देशांतर्गत परिस्थिती, शेजारी देशाशी असलेले संबध व देशाची संरक्षक विषयक भूमिका या सर्वांच्या विचार करता सगळ्याच गोष्टी जगजाहीर करता येत नसतात. आणि हे आम्हीच केले असे म्हणून उगाच कोणी डांगोराही पिटून सर्जिकल स्ट्राईक बाबत श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये राजकारणी लोकांना राजकारण करायला फक्त मुद्दा हवा असतो, मग ते नेते सत्ताधारी पक्षातले असोत की विरोधक. भारताची एकता अबाधित राखण्यासाठी अशा राष्ट्रीय मुद्द्याविषयी एकमेकांवर चिखलफेक केल्यापेक्षा सर्वांनी ह्या मुद्द्यावर न बोलणेच योग्य ठरेल..! बाकी राहिला मुद्दा जनतेच्या हिताचा, तर त्यासाठी शेतकरी आत्महत्या, दारिद्र्य निर्मुलन, पाणी टंचाई, वाढती लोकसंख्या, बेरोजगारी ह्या मुद्द्यावर देखील बोला ना, पण मात्र अशा राष्ट्रीय मुद्द्यावर बोलून ‘आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी’ असे वागणे म्हणजे खरी गरज आहे ती तुमच्या असल्या शंकेखोर विचार करण्याच्या प्रवृतीचे सर्जिकल करण्याचे..!.

Tuesday 13 September 2016

सत्याचा आवाज दाबला जाऊ नये.

मुंबई महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी पाच लाखाची लाच मागितल्या प्रकारी ‘विनोदवीर’ कपिल शर्माने उगाच वाद ओढवून घेतला. पण या प्रकरणाची दुसरी बाजूही लक्षात घेणे आवश्यक आहे, की पंधरा कोटी रुपये कर भरून देखील कोणी लाच मागत असेल तर आपल्या समाजाला कीड नव्हे भयंकर रोग झाला आहे. निर्भीडपणे नरेंद्र मोदींनाच ट्विट काल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी दखल घेणे अपेक्षितच होते पण कोणताही पुरावा नसताना एखाद्यावर आरोप करणे ही नक्कीच अपमानास्पद बाब आहे. आपला समाज हा कलाकारांचे अनुकरण फार करतो कपिल शर्मा हा प्रसिद्ध कलाकार असल्यामुळे त्यानेही आपण काय बोलतो कसे वागतो याचा थोडा विचार करायला हवा आणि समजा  खरेच कोणी लाच मागितली असेल आणि संबधित अधिकाऱ्याचे नाव केवळ राजकीय दबावामुळे तो सांगत नसेल तर ही एकप्रकारची दडपशाही ही असू शकते. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत त्यामुळे कपिलच्या या वक्त्यव्याने राजकारण्यांना आयतेच कोलीत मिळाले आहे. एखाद्या कामासाठी शासकीय कर्मचाऱ्याकडून लाच मागणे हा जसा गुन्हा आहे तसाच बेकायदा बांधकाम करणे, तिवरांची झाडे तोडणे हा देखील गुन्हाच आहे पण मुंबई नगर पालिकेने आत्ताच कापील शर्मा विरुद्ध गुन्हा दाखल करणे हे संभ्रम मिर्माण करीत आहे. आपल्यावर जर खरोखरच अन्याय होत असेल तर आवाज उठवायलाच हवा..किंवा जर कोणी त्याविरुद्ध आवाज उठवीत असेल तर त्याला पाठींबा तरी द्यायला हवा फक्त तो आवाज निष्पक्ष हवा..! 

Sunday 4 September 2016

मिरचीचा 'हिरवा चिखल' न होवो.!


मागील दोन वर्षापासून मिरची ह्या पिकावर रोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव  असल्यामुळे परिणामी मिरचीने भावाचा नवीन उच्चांक गाठला. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे ह्या वर्षी मिरचीची लागवड मोठ्या प्रमाणात झाली. आणि जे अपेक्षित होते तेच झाले. चौदा रुपये प्रति किलो विकली गेलेली मिरची आज पाच रुपये प्रती किलो या भावाने विकली जात आहे. व्यापारी वर्गाकडून एक प्रकारे शेतकऱ्यांना वेठीस धरले जात आहे. जिवाची तम न बाळगता शेतकरी रात्रंदिन अपार कष्ट करतो तेंव्हा कुठे पीक त्याच्या हाती लागते. पण एवढे करूनही शेतकरी मार खातो ते मार्केटिंगमध्ये, सर्वच बाबतीत सरकार शेतकऱ्यांची मदत करू शकणार नाही. त्यामुळे 'ट्रेंड' बघून शेतकऱ्यांनी आपापल्या पिकांचे नियोजन केल्यास आज मिरचीची जी परिस्थिती आहे त्यासारखी परिस्थिती निर्माण होणार नाही. अर्थ शास्त्राच्या मांगणी आणि पुरवठा हा सिद्धांतही लक्षात घेणे आवश्यक आहे. एखाद्या पिकाला जर चांगला बाजार भाव मिळत असेल तर सर्वांनीच  त्याकडे वळणे योग्य ठरणार नाही कारण उत्पादन जास्त झाले कि बाजार भाव आपोआपच कमी होतात. केवळ एकाच पीक न घेता वेगवेगळ्या प्रकारची पिके शेतकऱ्यांनी घेतल्यास जेणे करूनएखाद्या शेत मालास भाव कमी मिळाल्यास दुसऱ्या पिकातून त्याची भरपाई करता येइल. याचप्रमाणे शेतमालाच्या मार्केटिंगचा अभ्यास करून पिकांचे नियोजन केल्यास याचाही शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल. सध्यातरी मिरचीने शेतकऱ्यांना ठसका लावला आहे, त्याचा 'हिरवा चिखल' न होवो एवढीच अपेक्षा...!

Tuesday 23 August 2016

आता लक्ष्य टोकियो ऑलिम्पिक २०२०

रिओ ऑलिम्पिकसाठी गेलेल्या भारतीय ११७ खेळाडूच्या चमूने फक्त दोन पदके प्राप्त केलीत ही गोष्ट नक्कीच विचार करण्याजोगी आहे. याला करणाच आपली व्यवस्था आहे. लहानपणापासूनच जर मुलांना शालेय शिक्षणाबरोबरीने खेळण्यास वाव दिला तर आपसूकच आत्ताचे हे चित्र वेगळे दिसेल यात शंका नाही. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी शालेय शिक्षणापासूनच त्याची तयारी करून घ्यायला हवी, त्यासाठी प्रत्येक शाळेत विविध खेळांचे अद्यावत प्रशिक्षण व प्रशिक्षक असणे अत्यंत आवश्यक आहे. आज प्रत्येक जन शाळेत जातो तो डॉक्टर, इंजिनीअर, वकील होण्यासाठी, खेळांकडे पाहण्याचा तरुणांचा दृष्टीकोनच नकारत्मक आहे. हा दृष्टिकोन बदलायला हवा विशेषतः ग्रामीण भागातील शाळेत तर अनेक विध्यार्थी असे असतात कि त्यांच्यामध्ये अचाट क्रीडा कौशल्य असतात आणि त्यांच्या ह्या गुणाला शिक्षक हेरतात पण अपुऱ्या क्रीडा सोईसुविधामुळे विध्यार्थ्यांचे हे कलागुण तिथेच लोप पावतात. त्यामुळे शासकीय पातळीवरून शहरासाहित ग्रामीण भागातही क्रीडा सुविधा उपलब्ध झाल्यास टोकियो २०२० च्या ऑलिम्पिकमध्ये नक्कीच यापेक्षा निराळे चित्र बघण्यास मिळेल अशी अशा करूयात...!

Tuesday 9 August 2016

खेड्यांचा सर्वांगीण विकास व्हावा..

शहराचा आणि गावाचा समतोल राखण्यासाठी खेड्यांचा विकास होणे अत्यन्त आवश्यक आहे. शासनाने रोजगाराभिमुख योजना राबवून खेडेगावातील तरुणांना प्रशिक्षित केले तर रोजगारासाठी शहरात होणारी गर्दी कमी होण्यास मदत होईल. दिवसेंदिवस कामानिमित्त ग्रामीण भागातील तरुण वर्ग शहराकडे वळतो आहे. वास्तविक पाहता कोणत्याही व्यक्तीला आपला गाव किंवा राष्ट्र आपणहून सोडावे लागत नाही केवळ परिस्थितीमुळे त्यांना हे करावे लागते. त्यामुळे गावातच रोजगाराची व्यवस्था उपलब्ध झाल्यास गाव तर प्रगत होईलच पण दिवसेंदिवस शहरात वाढत चाललेल्या गर्दीला आळा घालणे शक्य होईल. महात्मा गांधीने फार पूर्वीच म्हटले होते कि खेड्याकडे चला, पण आता पर्यंत तरी म्हणावा हा विषय सरकार ने गांभीर्याने घेतलेला दिसत नाही. आता अगदी खरोखरच गरज अशे ती खेड्याकडे वळण्याची. गावपातळीवर विविध शेतकऱ्यांसाठी शासनाच्या विविध कल्याणकारी योजना असतात. पण केवळ माहिती नसल्याने ग्रामीण भागातील तरुण शेतकरी वर्ग यापासून वंचित राहतो आणि माहिती असलीही तरी साहेबांचा खिसा गरम केल्याशिवाय काम होण्याची तसु भरही शक्यता नसते हि परिस्थिती बदलायला हवी. बेरोजगरीमुळे एकीकडे खेडी ओस पडताहेत तर शहरे अवाढव्य विस्तारत आहेत, त्यामुळे भविष्यात निर्माण होणारा हा धोका लक्षात घेऊन वेळीच उपाय योजना करायला हवी. ग्रामीण भागातील तरुणांना गावातच प्रशिक्षण देऊन शेतीपूरक व्यवसायाचे प्रशिक्षण त्यासाठी लागणारे भाग भांडवलाची व्यवस्था केल्यास, गावमध्येच रोजगार निर्माण होईल परिणामी इतर तरूणांना हि त्यासोबत रोजगाराच्या संधी उपलब्ध होईल. तरुणांनी देखील केवळ नोकरीसाठी शिकता व्यवसायाभिमुख शिक्षणाची कास धरल्यास झपाट्याने फुगणारी शहरे आणि एकीकडे ओस पडणारी खेडी यांचा सुवर्णमध्य निघू शकेल अशी आशा करूयात.

Tuesday 19 July 2016

समाज मनपरिवर्तनाची आवशक्यता.


कोपर्डी अत्याचाराचा कराल तेवढा निषेध कमीच आहे. दिल्लीतील निर्भया प्रकरणामुळे कायद्यामध्ये बदल करून देखील अशा घटना घडत असेल तर ही अगदी लाजिरवाणी बाब आहे. कितीही कायदा केला, आंदोलने केली तरी अशा घटना थांबणे शक्य नाही हेच कोपर्डी येथील घटनेतून अधोरेखित झाले आहे. असली घटना परत घडू नये यासाठी कडक कायदा तयार करून तो काटेकोर पणे अमलात आणण्याची आवश्यकता आहे. तरुण वर्गावर चित्रपटांचा मोठ्या प्रमाणावर प्रभाव असल्यामुळे अशा घटना घडण्यामागे बऱ्याच अंशी चित्रपट जबाबदार असू शकतात. बलात्कारासारख्या गुन्ह्यामध्ये आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे. त्यात जात धर्म किंवा पंथ हा निकष असता कामा नये. राज्याची सुरक्षितता ही सरकारची मुलभूत जबाबदारी आहे त्यामुळे आरोपींना कडक शिक्षा व्हावी हीच जनतेची अपेक्षा असेल हे नक्की..

Wednesday 13 July 2016

मुलांवर अपेक्षांचे ओझे लादू नका.


नुकत्याच बाळापुर येथील घडलेल्या घटनेमुळे मन अगदी सुन्न झाले. केवळ उजळणीचा एक पाढा बिनचूक न म्हणता आल्यामुळे एका ६ वर्षाच्या निरागस चिमकुलीस आपला जीव गमवावा लागला. आपल्या समाजाची मानसिकताच पार ढेपाळलली आहे. जितका समाज सुशिक्षित होत चालला आहे किंबहुना त्याहीपेक्षा क्रूरतेचा कळस गाठत आहे असे म्हणण्यास हरकत नाही, आणि याला कारणीभूत आहे ती आजची स्पर्धात्मक जीवघेणी शिक्षण पद्धती. मुलांपेक्षा पालकांच्याच अपेक्षा पूर्ण करण्याचाच जास्त ताण मुलांवर असतो, शेजारील अमुक एक विद्यार्थ्याने बघ तुज्यापेक्षा जास्त गुण मिळवले, तुझ्या मित्राने अमुक एका स्पर्धेत बक्षीस मिळवले, आणि तू मात्र ढिम्मच अशा आशयाची सतत टोमणी मुलांना दिल्यामुळे ते सतत नैराश्येमध्ये वावरत असतात आणि मग आई वडिलांच्या अपेक्षा पूर्ण करण्यास असमर्थ झाल्यामुळे टोकाचे पाऊल उचलतात. याला सर्वस्वी आपण जबाबदार आहोत. मुलांना हे कर ते कर अशा उपदेश देण्याआगोदर याच वयात असतांना आपण किती आपल्या आईवडिलांच्या अपेक्षा पूर्ण करू शकलो याचे विश्लेषण करावे. पालकांनी आपल्या अपेक्षांचे ओझे मुलांवर न लाधता आजच्या त्यांची मानसिकता आणि कल ओळखून त्यांना हवे त्या क्षेत्रामध्ये करिअर करण्यास संधी द्यावी.