Wednesday 29 November 2017

खेड्यातील अवलिया तरुण करणार एड्सवर जाणीव जागृती


१ डिसेंबर हा जागतिक एड्स विरोधी दिन म्हणून जगभर साजरा करण्यात येतो. एड्स हा विषयच खूप मोठा आहे, एरवी पुण्यतिथी जयंत्या मोठ्या प्रमाणात साजऱ्या करणाऱ्या या देशात एड्स रोगाविषयी खूप कमी प्रमाणात बोलले जाते. मागील काही वर्षामध्ये एड्स रोगाविषयी तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणावर जाणीव जागृती होत आहे ही बाब आशादायक आणि स्वागताहार्य आहे. ग्रामीण भागामाध्ये तर लैंगिक विषयावर बोलणेच अस्पृश्य ठरवले जाते त्यामुळे एड्स सारख्या जीवघेण्या रोगाविषयी ग्रामीण नागरिकांना माहिती देणे खूपच कठीण होऊन जाते आणि हीच बाब अधोरेखित करून भोकरदन तालुक्यातील कोळेगाव येथील युवक दादाराव गावंडे पुढे सरसावला आहे. सध्या जवळपास प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहेत त्यामुळे व्हाट्सअप फेसबुक, युट्यूबचा वापरही मोठ्या प्रमाणात होत आहे आणि याच सामाजिक माध्यमांचा उपयोग करून एड्स रोगाविषयी ग्रामीण युवकांमध्ये लघुपटाद्वारेमाहितीचा प्रसार करण्याचा दादाराव गावंडे या तरुणाचा मानस आहे. युट्यूब वर डीजीटल डीजी आणि रुरल टीव्ही असे दोन चॅनल्स हा तरुण चालवत आहे. वेगवेगळ्या शासकीय योजनेसाठी अर्ज कसे करावेत यासंदर्भात व्हिडिओद्वारे नागरिकांना मार्गदर्शन करण्याचे काम निरंतर हा तरुण करत आहे. किंवा गावामध्ये काही समस्या असेल तर त्या संदर्भात संबधित व्यक्तीची मुलाखत घेऊन ती समस्या सर्व गावकऱ्यांच्या समोर मांडून त्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले जातात. आपण ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजाचे आपणासही काही देणे लागते याच भावनेतून आता एड्स रोगाविषयी १ डिसेंबर या जागतिक एड्स विरोधी दिनाच्या दिवशी गावातीलच काही तरुणांच्या मदतीने लघुपट निर्मितीची सुरुवात होत आहे. एड्स विषयी तरुणांच्या मनात थोडी देखील जागृती झाली तरी या लघुपटाचे हे खूप मोठे यश असेल यात तीळमात्र शंका नाही.

No comments:

Post a Comment