Saturday 11 November 2017

सोशल मिडीयाचा प्रभाव, मी कोळेगावकर ग्रुप तर्फे विविध उपक्रम

सोशल मिडीयाचा विकास कामासाठीसुद्धा उपयोग केला जाऊ शकतो हे सिद्ध झाले आहे तो कोळेगाव येथे राबविलेल्या  विविध उपक्रमांतून, भोकरदन तालुक्यातील कोळेगाव येथील ‘मी कोळेगावकर’ या व्हाट्सअप ग्रुपवर कोळेगाव येथील युवक गावासंबाधित विविध विषयांवर चर्चा करतात. मागील चर्चा  ही शाळेतील समस्यांविषयी होती. शाळेच्या विविध समस्यावर यावेळी प्रकाश टाकण्यात आला व काय सुधारणा करता येऊ शकतात यावर विचारमंथन करण्यात आले. यावेळी गावातीलच तरुण सचिन सुसर यांनी शाळेतील खेळाच्या साहित्याविषयी चिंता व्यक्त केली आणि स्वतः प्रेरित होऊन शाळेस तीन फुटबॉल भेट दिले. गावातीलच जिल्हा परिषद शिक्षक श्री देविदास गावंडे सर यांनी गावातील होतकरू विध्यार्थ्यानाठी उन्हाळी सुट्टीमध्ये मोफत शिकवणी देणार असल्याचे जाहीर केले. गावाची खरी शोभा ही स्वच्छता असते त्यामुळे मी कोळेगावकर ग्रुप मधील सदस्यांनी ठरल्याप्रमाणे जिल्हा परिषद शाळा येथे साफसफाई केली, एकंदरीत शोशल मिडीयाचा गंधही नसलेल्या गावात तरुणांनी एकी केली तर किती बदल घडू शकतात याचे हे जिवंत उदाहरण आहे असे म्हणता येईल. मोबाईलवर केवळ मनोरंजनासाठी फिरणारी बोटे केंव्हा विकासाची चर्चा करू लागलेत हे त्यानाही कळले नाही, कोणी कल्पना ही केली नसतांना सोशल मिडीयावर मिळत असलेल्या तरुणांच्या प्रतिसादामुळे ग्रुपमधील सदस्यांमध्ये कमालीचे चैतन्य संचारले आहे. केवळ निर्णय घेण्याचा अवकाश असतो की लगेच सर्व सदस्य कामाला लागतात. मी कोळेगावकर ग्रुपचे सर्व सदस्य गाव विकासासाठी झटत आहेत आणि त्यांना यशही मिळत आहे ही बाब नक्कीच अभिमानास्पद आणि कौतुकास्पद आहे असे म्हणण्यास हरकत नाही.

No comments:

Post a Comment