Friday 2 October 2020

युट्युबर व्हा, करिअर घडवा.

 
 
मित्रांनो आज मी ज्या वळणावर आहे तो केवळ तुमच्यामुळे, तुम्ही आहात म्हणून मी आहे. मी एक खेडेगावातील तरुण आहे. खेडेगाव म्हटले कि एक चित्र आपल्या डोळ्यासमोर उभे राहते ते म्हणजे अशिक्षित लोकांचा समूह होय मी देखील याच समूहातला आहे. जेंव्हा एखादी शासकीय योजना गावासाठी येते त्यावेळी त्या योजनेची माहिती प्रत्येक नागरिकांना होईलच असे नाही परंतु सोशल मिडीयाच्या माध्यमातून ती माहिती लोकांपर्यंत पोहचविली तर नक्कीच नागरिक ती माहिती वाचतात आणि त्यांना शासकीय योजनेची माहिती मिळते.शेतकऱ्यांसाठी बऱ्याच शासकीय योजना असतात परंतु त्या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचत नाही, मी देखील शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी बराच प्रयत्न केला पण केवळ माहिती न मिळाल्यामुळे मला काही योजनांच लाभ घेता आला नाही आणि या गोष्टीची सल सारखी मनाला टोचत होती कि आपण एवढे शिकलो (B.com) असून देखील आपण एखाद्या योजनेचा लाभ घेऊ शकत नसेल तर मग गावातील नागरिकांचे काय हाल आहेत. 

 

मी एका खाजगी ठिकाणी नोकरी करत असल्यामुळे मला हे काम करण्यासाठी वेळ मिळत नसे मग मी फावल्या वेळेत हि सर्व माहिती शोधून ती फेसबुक आणि व्हॉट्सअप या समाजमाध्यमांवर शेअर असे परंतु नंतर माझ्या लक्षात आले कि या गोष्टीला आकार देणे गरजेचे आहे. मग मी माझे युट्युब चॅनल सुरु करण्याचे ठरविले आणि मग सर्व शासकीय योजनांची माहिती असो किंवा नोकरीची माहिती असो किंवा इतर महत्त्वाची माहिती असो मी ती व्हिडीओद्वारे माझ्या युट्युब चॅनलवर प्रकाशित करू लागलो. खाजगी नोकरी करत असल्यामुळे त्यावेळेस या सर्व गोष्टींना वेळ मिळत नव्हता परंतु रात्रीच्या वेळत किंवा सुट्टीच्या दिवशी जमेल तसे माहितीचे व्हिडीओज मी माझ्या डिजिटल डीजी या युट्युब चॅनलवर प्रकाशित करत राहत होतो त्यानंतर मला माहिती मिळाली कि युट्युबद्वारे आपण पैसे देखील कमावू शकतो.
 
    

युट्युबच्या व्हिडीओमुळे पैसे मिळतात हे मला २०१८ या वर्षामध्ये माहिती पडले आणि मग मी ती सर्व प्रक्रिया समजावून घेतली. युट्युब मॉनिटाइजेशन ॲडसेंस ॲप्रोव्हल मिळविण्यासाठी गुगलकडे ॲडसेंसकडे अर्ज करावा लागतो आणि मग गुगलकडे ॲडसेंस ती सर्व माहिती तपासून मान्यता देतात.  मी दोन वेळेस ॲडसेंस ॲप्रोव्हलसाठी अर्ज केला पण माझा अर्ज नाकारला गेला मात्र तिसऱ्या वेळेस माझा अर्ज मंजूर झाला आणि माझ्या युट्युब चॅनलला पैसे कमविण्याची संधी निर्माण झाली. खाजगी नोकरी करत असल्यामुळे मला व्हिडीओ तयार करण्यास वेळच मिळाला नाही त्यामुळे युट्युबला पाहिजे तेवढा वेळ मी देऊ शकलो नाही. मला लिखाणाची देखील आवड होती आणि अजूनही आहे. मी २०१४ मध्ये गुगल ब्लॉगस्पॉट वर एक मोफत ब्लॉग निर्माण करून माझ्या सोशल मिडियावरील लेखनाचा श्रीगणेशा केला होता आणि त्यावर 200 ते 300 ओळीपर्यंत कंटेंट लिहायला सुरुवात केली पण या मोफत उपलब्ध असलेल्या ब्लॉगलाखूपच कमी प्रतिसाद मिळत होता. पुन्हा मझ्या असे लक्षात आले कि स्वतःचे डोमेन नेम खरेदी करून जर वर्डप्रेसवर या सी एम एस वर ब्लॉग बनविला तर ब्लॉगला SEO ( Search Engine Optimization ) करून ranking करता येईल मग मी डिजिटल डीजी हा माझा ब्लॉग बनविला परंतु SEO हा विषय खूप मोठा असल्यामुळे मला ते काही जमले नाही परंतु म्हणतात ना चालायला लागले कि रस्ता आपोआप सापडतो त्याच प्रमाणे मला वेबसाईट संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी औरंगाबाद येथील माझे एक स्नेही यांनी खूप मदत केली. ब्लॉग आणि युट्युब चॅनल दोन्ही माझे सुरु होते परंतु त्याकडे मी कधी करिअर म्हणून बघितलेच नाही. सोशल मिडियामुळे अमेरिकेची सत्ता बदलली...ज्या सोशल मीडियाचा प्रभावी उपयोग केल्यास सत्ता बदलू शकते हे भारताने २०१४ च्या निवडणुकीत बघितले... फ्रान्समधील, यलो वेस्ट चळवळ (yellow vest movement) हा सोशल मिडीयाचाच भाग होता. एवढे असतांनाही जर तुम्ही सोशल मीडियाकडे करिअर म्हणून बघत नसाल तर मला वाटते सोशल मिडीयाच्या खूप मोठ्या संधीस आपण मुकत आहोत.

वैयक्तिक कारणामुळे जुलै २०२० मध्ये मला नोकरी सोडण्याची वेळ आली आणि आता पुढे काय असा प्रश्न निर्माण झाला, याच काळामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात चालू होता ( जो कि सध्या देखील सुरु आहे) नोकरी नाही, उद्योग धंदा नाही, नजरेपुढे अगदी गडद अंधार होता पण म्हणतात ना गरज हो शोधाची जननी आहे आणि गरज निर्माण झाली कि माणूस कोणताही शोध लावू शकतो. खाजगी नोकरी करत असल्यामुळे युट्युब आणि वेबसाईट(ब्लॉग) हे अडगळीत पडलेले होते, त्यालाच मी उत्पन्नाचे साधन बनविण्याचे ठरविले आणि असेही हाताला काही काम नसल्यामुळे संपूर्ण वेळ मी युट्युब चॅनलवर काम करण्याचे ठरविले. मी सातत्याने युट्युबवर सतत काम करत होतो माझ्या युट्युब चॅनलवरील व्हिडीओज मुळे अनेकांना फायदा होत आहे आणि यामुळे लोकांना माझ्या युट्युब चॅनलवरील व्हिडीओ आवडायला लागले. इंटरनेटवर कधीही काहीही होऊ शकते. या विचाराशी मी पूर्णपणे सहमत आहे. मी शेतकऱ्यांच्या विविध योजनासंबधी माहिती देण्यास सुरुवात केली आणि माझे सबस्क्रायबर व पैसा दोन्ही वाढायला लागले आहेत. आज नोकरी नसतांना आणि पैशांची अत्यंत गरज असतांना २० ते २५ हजार प्रती महिना कमावत आहे आणि हि नक्कीच माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे आणि बोनसमध्ये समाधान मिळते ते वेगळेच.

तरुण मित्रांना मला एवढेच सांगायचे आहे कि नोकरी नसेल तर निराश होऊ नका. समाजमाध्यमांमध्ये तुम्ही तुमचे करिअर घडवू शकतात,तुमच्यामध्ये काही कौशल्य असेल तर ते लोकांसमोर मांडून तर बघा यश नक्की मिळेलच. मी खेडेगावातील आहे, ते माझे कामच नाही, माझ्याकडून होईल का? हा न्यूनगंड मनातून आधी काढून टाका, स्वतःवर विश्वास ठेवायला शिका आणि अपयशाची भीती न बाळगता तुमच्या कामात सातत्य ठेवा  समोर मग बघा विजय तुमचाच आहे. सुरुवातीला तुम्ही अडखळाल, लोकं तुम्हाला हसतील, मात्र तुम्ही ठाम राहा, अगदी त्या विशाल पर्वतासारखे जो उन वारा पाउस यांची कसलीही चिंता न करता अगदी कणखर पणे उभा असतो. तुम्ही देखील तसेच व्हा अगदी ठाम विशाल पर्वतासारखे अगदी विशाल!


2 comments:

  1. सुंदर.... प्रेरणादायी ....जीवनप्रवास....

    ReplyDelete
  2. Dadarao Gavande: युट्युबर व्हा, करिअर घडवा. >>>>> Download Now

    >>>>> Download Full

    Dadarao Gavande: युट्युबर व्हा, करिअर घडवा. >>>>> Download LINK

    >>>>> Download Now

    Dadarao Gavande: युट्युबर व्हा, करिअर घडवा. >>>>> Download Full

    >>>>> Download LINK 01

    ReplyDelete