Sunday 4 September 2016

मिरचीचा 'हिरवा चिखल' न होवो.!


मागील दोन वर्षापासून मिरची ह्या पिकावर रोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव  असल्यामुळे परिणामी मिरचीने भावाचा नवीन उच्चांक गाठला. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे ह्या वर्षी मिरचीची लागवड मोठ्या प्रमाणात झाली. आणि जे अपेक्षित होते तेच झाले. चौदा रुपये प्रति किलो विकली गेलेली मिरची आज पाच रुपये प्रती किलो या भावाने विकली जात आहे. व्यापारी वर्गाकडून एक प्रकारे शेतकऱ्यांना वेठीस धरले जात आहे. जिवाची तम न बाळगता शेतकरी रात्रंदिन अपार कष्ट करतो तेंव्हा कुठे पीक त्याच्या हाती लागते. पण एवढे करूनही शेतकरी मार खातो ते मार्केटिंगमध्ये, सर्वच बाबतीत सरकार शेतकऱ्यांची मदत करू शकणार नाही. त्यामुळे 'ट्रेंड' बघून शेतकऱ्यांनी आपापल्या पिकांचे नियोजन केल्यास आज मिरचीची जी परिस्थिती आहे त्यासारखी परिस्थिती निर्माण होणार नाही. अर्थ शास्त्राच्या मांगणी आणि पुरवठा हा सिद्धांतही लक्षात घेणे आवश्यक आहे. एखाद्या पिकाला जर चांगला बाजार भाव मिळत असेल तर सर्वांनीच  त्याकडे वळणे योग्य ठरणार नाही कारण उत्पादन जास्त झाले कि बाजार भाव आपोआपच कमी होतात. केवळ एकाच पीक न घेता वेगवेगळ्या प्रकारची पिके शेतकऱ्यांनी घेतल्यास जेणे करूनएखाद्या शेत मालास भाव कमी मिळाल्यास दुसऱ्या पिकातून त्याची भरपाई करता येइल. याचप्रमाणे शेतमालाच्या मार्केटिंगचा अभ्यास करून पिकांचे नियोजन केल्यास याचाही शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल. सध्यातरी मिरचीने शेतकऱ्यांना ठसका लावला आहे, त्याचा 'हिरवा चिखल' न होवो एवढीच अपेक्षा...!

No comments:

Post a Comment