Sunday 30 July 2017

विकासाची रिबीन आणि कात्री.

सिल्लोड येथे दिनांक २९ जुलै रोजी केंद्रीय दळणवळण व भूपृष्ठ्मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते औरंगाबाद- जळगाव रस्त्याच्या सिमेंटीकरण कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी गडकरी साहेब म्हणाले की सदरील रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर दानवे साहेबांच्या हातात कात्री तर सत्तार साहेबांच्या हातात रिबीन असेल. किती क्रांतीकारी विचार आहेत हे. शेजारचा चीन डुरक्या फोडतोय तर पाकिस्तान वाकुल्या दाखवतोय अशा परिस्थितीमध्ये देशामध्ये राजकीय पातळीवरून एकात्मतेचे प्रदर्शन होणे आवश्यक आहे. कारण कार्यकर्त्यांवर किंबहुना जनतेवर आपले लोकप्रतिनिधी कसे वागतात ह्याचा खूप मोठा परिणाम होत असतो त्यामुळे विकास कामामध्ये खरोखरच जर राजकारणाला दूर ठेवले तर डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांचे २०२० पर्यंत भारत महासत्ता होण्याचे स्वप्न पूर्ण झालेच म्हणून समजा. इंग्रजांनी हेच केले होते फोडा आणि राज्य करा आणि पुन्हा सर्वाना एकत्र होण्यासाठी कित्येकांचे बळी गेले कित्येक दिवस वाट बघावी लागली आणि नंतर स्वातंत्र्य मिळाले त्यामुळे मिळालेले हे स्वातंत्र्य असेच अबाधित ठेवण्यासाठी किंबहुना देशाची प्रगती करण्यासाठी आज सर्व राजकीय नेत्यांनी किमान विकास कार्यामध्ये तरी राजकीय जोडे बाहेर ठेवून सकारात्मकता ठेवून सहकार्य करण्याची अपेक्षा आहेत. तरच खऱ्या अर्थाने विकास कामांची रिबीन आपण समतेच्या कात्रीने कापू शकू यात तिळमात्र शंका नाही.