Sunday 1 September 2019

कोळेगाव येथे बैलपाडव्या निमित्त कुस्ती स्पर्धेचे आयोजन


भोकरदन तालुक्यातील कोळेगाव येथे पोळा व बैल पाडवा सण उत्साहात साजरा करण्यात आला. कोळेगाव येथे दरवर्षी पोळ्याच्या दुसऱ्या दिवसी बैल पाडव्याचे आयोजन केले जाते. पाडव्या निमित्त पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी आपापल्या बैलांसाहित भैरवनाथ महाराजांच्या मंदिरास प्रदक्षिणा घालून मोठ्या भक्तीभावाने दर्शन घेतले. जवळपास एक लक्ष भाविक भक्तांची आवक जावक असलेल्या या पाडव्यास गैरसोय होऊ नये यासाठी संस्थानच्या वतीने यावेळी विशेष व्यवस्था करण्यात आली होती.
सोशल मिडीयाच्या काळात मैदानी खेळ लोप पावत आहेत आणि याच बाबीचे महत्त्व लक्षात घेऊन कोळेगाव येथील भैरवनाथ महाराज मंदिर परिसरामध्ये दरवर्षी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या भोंगा या चित्रपटातील कलाकार अविनाश कोलेते यांची या कुस्ती स्पर्धेस विशेष उपस्थिती होती. यावर्षी आयोजित केलेल्या कुस्ती स्पर्धेचा शुभारंभ डॉ. ईश्वर वाघ यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आला. कोळेगाव पंचक्रोशीतील हौशी मल्लांनी मोठ्या प्रमाणात पाडव्यास हजेरी लावून कुस्त्यांच्या आनंद लुटला. ढगाळ हवामान व पावसाची रिप रिप असल्यामुळे कुस्ती स्पर्धेसाठी किती मल्ल येथील याबाबत साशंकता निर्माण झाली होती मात्र मल्लांची उपस्थिती आणि उत्साह वाखाणण्याजोगा होता. संस्थानच्या वतीने पुरविण्यात येत असलेल्या सोविसुविधामुळे दिवसेंदिवस भक्तांच्या संख्येत वाढ होत असून लवकरच शासनाकडे तीर्थक्षेत्राचे मानांकन मिळावे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत भैरवनाथ महाराज संस्थांच्या अध्यक्षांनी व्यक्त केले. यावेळी संस्थानचे अध्यक्ष श्री सांडू गावंडे, आर.डी. गावंडे, सखाराम सुसर, गजानन गावंडे, अनिल भाऊ गावंडे, पंडितराव गावंडे, पुंडलिकराव गावंडे, डॉ. ईश्वर वाघ, सारंगधर सुसर, तेजराव गावंडे, रामू दादा, उत्तमराव गावंडे, रामचंद्र गावंडे, दादाराव गावंडे, साहेबराव महाराज, विठ्ठल महाराज, विष्णू ठुबे, नंदकिशोर सुसर, भागवत गावंडे, राजू सोन्नी, कमलाकर गावंडे, परमेश्वर गावंडे, एकनाथ सुसर, अंकुश गावंडे, रविंद्र गावंडे आदींसह ग्रामस्थांची उपस्थिती होती. 
प्रतिक्रिया
खेड्यातील तरुणांच्या सुप्त गुणांना या स्पर्धेमुळे वाव मिळेल तरुणांनी मोबाईलवरील खेळापेक्षा मैदानी खेळाची कास धरावी, कोळेगावकरांचे मनापासून धन्यवाद” 

अविनाश कोलते (राष्ट्रीय पुरस्कार विजेता भोंगा चित्रपट कलाकार)

कुस्ती स्पर्धेमुळे तरुणांच्या मनांत मैदानी खेळाविषयी उत्सुकता निर्माण करणे यामुळे सोपे होईल ज्यामुळे त्यांची शारीरिक तंदरुस्ती वाढेल आणि कुस्ती खेळाविषयी प्रचार आणि प्रसार देखील सहजतेने होईल”
पंडितराव गावंडे (मा.सरपंच कोळेगाव)

“तरुणांच्या कला गुणांना वाव मिळावा त्यांना मैदानी खेळ खेळण्यास प्रोहत्सान मिळावे यासाठी दरवर्षी कोळेगाव यथे कुस्तीस्पर्धा भरविली जाते. याही पुढे अधिक चांगल्या पद्धतीने कुस्ती स्पर्धा आयोजित करण्याचा गावकऱ्यांचा मानस आहे”
डॉ. ईश्वर वाघ (प्रतिष्ठित गावकरी तथा सामाजिक कार्यकर्ता)