Saturday 7 March 2020

मुलींच्या कमतरतेमुळे 'बायको मिळेना लग्न जुळेना' परिस्थिती.


मुलगा म्हणजे वंशाचा दिवा आणि मुलगी म्हणजे परक्याचे धन ह्या वृत्तीला आज आपल्याला कायमची मूठमाती देण्याची गरज निर्माण झाली आहे. मागील काही वर्षापूर्वी केलेल्या अमाप स्त्री अर्भक गर्भपातामुळे समाजामध्ये मोठ्या प्रमाणात स्त्री पुरुष प्रजनन संबधी असंतुलन निर्माण झाले आहे. मुले जास्त आणि मुलींची संख्या कमी असल्यामुळे अनेक तरुणांना लग्नासाठी ‘बायको मिळेना लग्न जुळेना’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि याचे परिणाम आजच्या तरुणांना भोगावे लागत आहे. महिलांनी प्रत्येक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली आहे अमाप क्षमता, कौशल्य व ज्ञान स्त्रियांजवळ असते यात तिळमात्र शंका नाही तरी देखील स्त्रियांना पूर्णपणे न्याय मिळाला आहे का? या प्रश्नांचे उत्तर नक्कीच हो असे आज तरी देता येणार नाही. शिक्षण क्षेत्रामध्ये शिकण्यासाठी जितक्या संधी मुलांना मिळतात तितक्याच संधी जर मुलींना मिळाल्या तर नक्कीच त्या त्यांचे अस्तित्व अधोरेखित करू शकतील ग्रामीण भागामध्ये काही अपवाद वगळला तर अजूनही मुलींना दहावी किंवा बारावीच्या पुढे शिक्षण घेण्याची संधी मिळत नाही. बारावीचे शिक्षण झाले म्हणजे वडिलांना तिचे हात पिवळे करण्याची घाई असते किंबहुना मुलगी हि एक जबाबदारी आहे लग्न झाले म्हणजे आपली जबाबदारी संपली असे मुलींच्या पालकांना वाटते असे म्हटल्यास अतिशोयोक्ती ठरणार नाही. केवळ महिला दिनाच्या एका दिवसासाठी नव्हे तर कायमचा मुलींना व महिलांना सम्मान आणि समानसंधी देण्याची गरज निर्माण झाली आहे.