Tuesday 5 September 2017

कोळेगाव येथे गणरायांना निरोप.


भोकरदन तालुक्यातील कोळेगाव येथे शांततेत गणपती विसर्जन करण्यात आले. गणपती स्थापने पासून ते विसर्जनापर्यंतच्या काळात गावामध्ये धार्मिक आणि उत्साहवर्धक वातावरण असते. गणपती स्थापनेपासून ते विसर्जनापर्यंतच्या काळात विविध सांस्कृतिक कार्यक्रम राबविले जातात. यामध्ये समाज प्रबोधनपर कीर्तने, शालेय विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या स्पर्धा, भारुडे. भजने इत्यादींचा समावेश असतो. गणपती विसर्जनाच्या दिवशी गावकऱ्यांच्या वतीने सामुहिक भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. गणरायाची आरती करून सजविलेल्या बैलगाडीतून गावभर मिरवणूक काढण्यात आली. गावातील आबालवृद्धानी हिरीरीने गणरायांच्या मिरवणुकीमध्ये सहभाग नोंदविला. विशेष बाब म्हणजे कोळेगाव येथे डी.जे. बँडबाजा किंवा तत्सम बाबतीत नाचण्यावर मागील पंधरा वर्षापासून पूर्णपणे बंदी घालण्यात आलेली आहे आणि याचे काटेकोरपणे पालन देखील होत आहे परंतु गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, यात्रा असे सामुहिक कार्यक्रम यासाठी अपवाद असल्यामुळे गणपती मिरवणुकीत तरुणांनी यथेच्छ नाचण्याचा आनंद लुटला. एक गाव एक गणपती ही संकल्पना मागील दहा वर्षापासून कोळेगाव येथे राबविली जात आहे आणि यापुढेही चालू ठेवण्याचा गावकऱ्यांच्या मानस आहे.

No comments:

Post a Comment