Wednesday 28 September 2016

कोळेगाव जि. प. शाळेस जाळ्या भेट.

भोकरदन तालुक्यातील कोळेगाव येथे कै. लीलाबाई व्यायाम शाळेतर्फे कोळेगाव जिल्हा परिषद शाळेस वृक्ष संरक्षण जाळ्या भेट देण्यात आल्या. झाडे लावा झाडे जगवा’ हे घोष वाक्य खऱ्या अर्थाने कृतीत उतरविले आहे ते कोळेगाव येथील नवतरुण माजी सरपंच पंडितराव गावंडे यांनी. कोळेगाव येथील शाळेत विदयार्थी संख्या वाढावी व विद्यार्थ्यांचे शिक्षणातील स्वारस्य वाढावे यासाठी शाळेत आकर्षक रंगरंगोटी केलेली आहे. त्याच प्रमाणे शाळेच्या परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले आहे. सदरील लावलेल्या झाडांना संरक्षण जाळ्या असल्यास झाडांना नुकसान होणार नाही या कल्पनेतून आणि ज्या शाळेत आपली पाल्य शिकताहेत त्या शाळेसाठी आपलेही काही देणे लागते या भावनेतून पंडितराव गावंडे यांनी स्वखर्चातून लोखंडी जाळ्या शाळेस भेट दिल्या आहेत. केवळ शासकीय मदतीवर अवलंबून न राहता प्रत्येकांनी शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी शक्य होईल तेवढी मदत करावी असे आवाहन यावेळी माजी सरपंच पंडितराव गावंडे यांनी केले आहे. यावेळी शिक्षक नागने सर, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष सुनील गावंडे, अंकुश गावंडे, शांताराम गावंडे, सांडू गावंडे, भाऊसाहेब गावंडे आदींची उपस्थिती होती.

Tuesday 13 September 2016

सत्याचा आवाज दाबला जाऊ नये.

मुंबई महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी पाच लाखाची लाच मागितल्या प्रकारी ‘विनोदवीर’ कपिल शर्माने उगाच वाद ओढवून घेतला. पण या प्रकरणाची दुसरी बाजूही लक्षात घेणे आवश्यक आहे, की पंधरा कोटी रुपये कर भरून देखील कोणी लाच मागत असेल तर आपल्या समाजाला कीड नव्हे भयंकर रोग झाला आहे. निर्भीडपणे नरेंद्र मोदींनाच ट्विट काल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी दखल घेणे अपेक्षितच होते पण कोणताही पुरावा नसताना एखाद्यावर आरोप करणे ही नक्कीच अपमानास्पद बाब आहे. आपला समाज हा कलाकारांचे अनुकरण फार करतो कपिल शर्मा हा प्रसिद्ध कलाकार असल्यामुळे त्यानेही आपण काय बोलतो कसे वागतो याचा थोडा विचार करायला हवा आणि समजा  खरेच कोणी लाच मागितली असेल आणि संबधित अधिकाऱ्याचे नाव केवळ राजकीय दबावामुळे तो सांगत नसेल तर ही एकप्रकारची दडपशाही ही असू शकते. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत त्यामुळे कपिलच्या या वक्त्यव्याने राजकारण्यांना आयतेच कोलीत मिळाले आहे. एखाद्या कामासाठी शासकीय कर्मचाऱ्याकडून लाच मागणे हा जसा गुन्हा आहे तसाच बेकायदा बांधकाम करणे, तिवरांची झाडे तोडणे हा देखील गुन्हाच आहे पण मुंबई नगर पालिकेने आत्ताच कापील शर्मा विरुद्ध गुन्हा दाखल करणे हे संभ्रम मिर्माण करीत आहे. आपल्यावर जर खरोखरच अन्याय होत असेल तर आवाज उठवायलाच हवा..किंवा जर कोणी त्याविरुद्ध आवाज उठवीत असेल तर त्याला पाठींबा तरी द्यायला हवा फक्त तो आवाज निष्पक्ष हवा..! 

Sunday 4 September 2016

मिरचीचा 'हिरवा चिखल' न होवो.!


मागील दोन वर्षापासून मिरची ह्या पिकावर रोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव  असल्यामुळे परिणामी मिरचीने भावाचा नवीन उच्चांक गाठला. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे ह्या वर्षी मिरचीची लागवड मोठ्या प्रमाणात झाली. आणि जे अपेक्षित होते तेच झाले. चौदा रुपये प्रति किलो विकली गेलेली मिरची आज पाच रुपये प्रती किलो या भावाने विकली जात आहे. व्यापारी वर्गाकडून एक प्रकारे शेतकऱ्यांना वेठीस धरले जात आहे. जिवाची तम न बाळगता शेतकरी रात्रंदिन अपार कष्ट करतो तेंव्हा कुठे पीक त्याच्या हाती लागते. पण एवढे करूनही शेतकरी मार खातो ते मार्केटिंगमध्ये, सर्वच बाबतीत सरकार शेतकऱ्यांची मदत करू शकणार नाही. त्यामुळे 'ट्रेंड' बघून शेतकऱ्यांनी आपापल्या पिकांचे नियोजन केल्यास आज मिरचीची जी परिस्थिती आहे त्यासारखी परिस्थिती निर्माण होणार नाही. अर्थ शास्त्राच्या मांगणी आणि पुरवठा हा सिद्धांतही लक्षात घेणे आवश्यक आहे. एखाद्या पिकाला जर चांगला बाजार भाव मिळत असेल तर सर्वांनीच  त्याकडे वळणे योग्य ठरणार नाही कारण उत्पादन जास्त झाले कि बाजार भाव आपोआपच कमी होतात. केवळ एकाच पीक न घेता वेगवेगळ्या प्रकारची पिके शेतकऱ्यांनी घेतल्यास जेणे करूनएखाद्या शेत मालास भाव कमी मिळाल्यास दुसऱ्या पिकातून त्याची भरपाई करता येइल. याचप्रमाणे शेतमालाच्या मार्केटिंगचा अभ्यास करून पिकांचे नियोजन केल्यास याचाही शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल. सध्यातरी मिरचीने शेतकऱ्यांना ठसका लावला आहे, त्याचा 'हिरवा चिखल' न होवो एवढीच अपेक्षा...!