Saturday 21 May 2016

आणि मी ‘सगुणाची’ संकल्पनाच बदलली...!

 आजारांची थोडी जरी लक्षण आढळून आली तरी दवाखान्यात नेण्या अगोदर एकदा तरी सपाट भांड्यावर आदला उभा करून ‘सगुण’ पहिल्या शिवाय त्यांना काही चैन पडत नसे. एकदा मी ठरविले की आमच्या आईचा हाच दृष्टीकोन त्यांना जरा वेगळ्या भाषेत समजून सांगूया. असाच एकदा मला ताप असतांना आईने माझा सगुण बघितला. घरातील जेवणाच्या परातीच्या गुळगुळीत पृष्ठ भागावर वेगवेगळ्या देवांची नावे घेवून ती आदला उभा करण्याचा प्रयत्न करीत होती अर्थात गुडी आणण्याचा प्रयत्न करीत होती, आणि एकदाचा तो आदला उभा राहिला आणि तिचा समज झाला की माझ्यावर अमुक एका देवाची अवकृपा झाली आहे. मी तिला सांगितले की मी तुला हाच आदला कोणत्याही देवाचे नाव न घेता उभा करून दाखविला तर?? त्यावर तिच्या सोबतीने घरातील सर्वच मंडळी म्हणाली की हे शक्यच नाही, आणि मग मी घरातील सर्वांना कोणत्याही देवाचे नाव न घेता आदला त्या सपाट परतीच्या गुळगुळीत पृष्ठभागावर उभा करून दाखविला. देवाच्या नावाशिवाय आदला उभा राहूच शकत नाही या घरातील मंडळीच्या फाटा दिला आणि बऱ्याच अंशी त्यांच्या मनातील अंधश्रद्धा दूर केल्याचे मला समाधान लाभले.
श्रद्धा ही सुप्त मनाची एक भावनिक शक्ती आहे, असे म्हणतात की कोणतीही गोष्ट सात वेळेस म्हटल्यावर आठव्या वेळेस प्वाइंट झिरो झिरो का होईना पण त्या गोष्टीचा मनावर परिमाण होतो याला शास्त्रीय आधार आहे. आणि याच गोष्टीचे भांडवल करून ढोंगी साधू बाबा याचा फायदा उठवतात. श्रद्धा डोळस आणि विज्ञानवादी हवी. देवांवर श्रद्धा जरूर असावी त्याने जगण्याला प्रेरणा मिळते अंधश्रद्धा मात्र मुळीच नसावी कोणताही बदल घघडवायला थोडा वेळ आणि साहस लागते. मानवाने यशाची विविध शिखरे पादक्रांत केली असून विज्ञानाच्या जोरावर सर्वच क्षेत्रावर हुकुमत गाजवलेली असतांना अंधश्रद्धेच्या बाबतीत काही प्रमाणात याला अपवाद आहे असेच म्हणावे लागेल. खेड्यातील परिस्थिती एकवेळ आपण समजू शकतो मात्र शहरातील लोकं सुद्धा याला अपवाद नाहीत किंबहुना अंधश्रद्धेच्या बाबतीत खेड्यापेक्षा शहरातील नागरिक जास्त अंधश्रद्धेच्या प्रभावाखाली असल्याचे दिसत आहेत. घरांची वास्तूशांती असो किंवा नवीन दुकानाचे उद्घाटन आजही शुभ दिवस, तिथी पाहून त्याची सुरुवात होते. अंधश्रद्धेची पाळेमुळे लोकांच्या मनात खोलवर रुतलेली असून तिला उपटून काढण्यासाठी प्रत्येकाने आपल्या घरांपासून सुरुवात करायला हवी तेंव्हाच समाजात मोठा बदल घडविणे शक्य होईल.

No comments:

Post a Comment