Wednesday 13 July 2016

अनामिक ओढ...

“गण्या लेका गुरं हाक की”, तशी गण्याची तंद्री भंग पावली आणि त्याने गुरे घराकडे हाकलली. सूर्य मावळला होताप्रकाश अंधुक झाला होतापणती तेवत होती आणि अचानक पतंगाने दिव्यावर झडप घातली..!
नाव “गणेश बापूराव पीपळेकर”.
सध्या काय करताय “शेती”.
अनुभव “बऱ्यापैकी”
      गणेश पीपळेकरने मुलाखत आटोपली आणि लगबगीने घरी जाण्यासाठी गाडी पकडली. गाडीच्या चाकापेक्षा डोक्यात चालू असलेल्या विचारांची गती अधिक जाणवत होती, जुलै संपला तरी वरून राजा काही हजेरी लावेना, उगवणारा प्रत्येक दिवस सोबत चिंता घेवून येत असे आणि मावळतांना ढवळून निघालेल्या गढूळ पाण्यातील गाळ खाली बसावा त्याप्रमाणे शांत होत असे; चिंतेची उत्तरे मात्र नेहमी पोरकीच असत. समोर दुष्काळ उभा ठाकला असतांना आयुष्याच्या उस्कटलेल्या गोधडीला नोकरीचे ठिगळ लावण्याच्या प्रयत्नात कागदावरील ‘गणेश’चा शेतातील गण्या पार वैतागून गेला होता. वाणिज्य शाखेची पदवी मिळाल्यानंतर गाण्याच्या शिक्षणाची वाढ खुंटली ती कायमचीच. शहरामध्ये काही दिवस खाजगी संस्थेत नोकरी केल्यानंतर म्हाताऱ्या आईवडिलांच्या देखभालीसाठी तो नोकरी सोडून गावाकडे आला तो कायमचाच. शेती होती पण सतत पडणाऱ्या दुष्काळामुळे त्याच्या मनातील हिरवळ केंव्हाच करपली होती.सोज्वळ चेहरा, मितभाषी व्यक्तिमत्व, साधी राहणी, आणि नेहमी आशावादी असणाऱ्या गाण्याला गावामध्ये फारच कमी मित्र होते.
       निवडणुकीचा काळ जवळ येत होता तसे तालुक्यामध्ये सोशल मिडियाचे वारे जोरात वाहू लागले होते. तालुक्यातील एका प्रतिष्ठित नेत्याने निवडणूक जिंकण्यासाठी सोशल मिडीयाचा प्रभावी वापर करण्याचे ठरविले, तीन महिन्यासाठी तसा करारही पुण्यातील सोशल मीडियातील एका नामवंत कंपनी सोबत केला होता. पुण्याच्या कंपनीनेही साहेबांचा हायटेक प्रचार करण्यासाठी कंबर कसली. स्थानिक हुशार आणि होतकरू तरुणांना या कामासाठी समाविष्ट करून घ्यावे या नेतेसाहेबांच्या विनंतीवरून कंपनीनी त्यासाठी वर्तमान पत्रामध्ये जाहिरात दिली होती आणि त्याचीच मुलाखत देऊन गण्या घरी आला होता.
      गाण्याच्या हुशारीला हेरून कंपनीने गाण्याला कामावर रुजू करून घेतले, तीन महिने का होईना पण पुण्यातील हुशार मंडळी बरोबर काम करण्याची संधी मिळाल्यामुळे गण्या खूप खुश होता.
“गणेशराव तुमच्याकडे जरी कॉम्पुटरची पदवी नसली तरी एक बेसिक नॉलेज आहे, आणि तुम्हाला मराठी चांगली येत असल्यामुळे आम्हाला विश्वास आहे की आम्ही दिलेली कामे तुम्ही वेळेत पूर्ण कराल. आमचा एक कर्मचारी तुमच्या सोबत असेल आणि दिवस भराच्या कामाचा तुम्हाला आम्हाला पुणे येथे रिपोर्ट करावा लागेल. कंपनीचे व्यवस्थापक गाण्याबरोबरच सगळ्यांना काम समजावून देत होते. आमची पूर्ण टीम तुम्हाला पुण्याहून ऑनलाइन मार्गदर्शन करेल अर्थातच आपण प्रत्यक्षपणे सोबत नसलो तरी अप्रत्यक्षपणे सोबत असू. तालुक्याच्या ठिकाणी एक कर्मचारी ठेवून कंपनीची टीम पुण्याला निघून गेली.
      इंटरनेट ने जोडलेले सुसज्ज संगणक, गाण्यासारखेच मुलाखतीद्वारे निवडलेले सहा तरुण, एक टेलीफोन, कळपातून एकटं मागे राहिलेलल्या हरिणीच्या पिल्लाप्रमाणे भेदरलेलं पुण्याच्या कंपनीचा एक कर्मचारी आणि या सर्वांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नेते साहेबांचे दोन विश्वासू निकटवर्तीय व्यक्ती इतक्या भांडवलावर ऑफिस सुरु झालं.
कामाचा पहिला दिवस होता, सर्वजण उत्साहात काम करीत होते. मेंढराच्या कळपात वाघाचं पिल्लू आसवं त्याप्रमाणे ‘श्रेयस’ दिसत होता. त्याला ना इथले राहणीमान आवडत होते ना वातावरण, फक्त एक प्रकल्प पूर्ण करायचा असल्यामुळे तो अगदी मेटाकुटीला येउन बोटावर दिवस मोजत होता.
“ बघा गणेशराव तुम्ही सोशल साईटवर साहेबांचे छायाचित्रे अपलोड करायचे, काकफळे तुम्ही अनिसने आणलेल्या साहेबांच्या छायाचित्रांची डिझाईन बनवून मला शेअर करायची, नरवडे तूम्ही साहेबांच्या एखाद्या इव्हेन्टचा मजकूर फास्ट टाईप करून मला शेअर करायचा. पुण्याहून केंव्हाही एखादी सूचना येऊ शकते त्यामुळे प्रत्येकाने आपापले स्काईप अकाउंट मध्ये सदैव ऑनलाइन राहा” श्रेयसने सगळ्यांना त्यांच्या कामाची विभागणी करून दिली.
      गाण्याला हे सर्व खूप मजेशीर वाटत होतं. पुण्याची लोकं त्यांची बोलण्याची पध्दत, स्काईप, फेसबुक, व्हाट्सअप, सोशल मिडिया. दिवस सशाच्या गतीने सुरु झाले.
“गणेशराव तुम्ही मला न रिपोर्ट करता आमच्या पुण्याच्या सोनल जोशींना स्काईपद्वारे रेपोर्ट करा. मला दुसरी कामे दिली आहेत कंपनीने” श्रेयस
      रणरणत्या उन्हामध्ये अनवाणी चालतानां अचानक थंड वाऱ्याचा झोताने मनाला वोलंचिंब करून टाकावे तशी गण्याची अवस्था झाली.
“काकफळे तुम्ही कुलकर्णी सरांना रेपोर्ट करा, अनिस तू सातपुते सरांना” श्रेयसने आम्हाला सगळ्यांना पुण्यातील कंपनीच्या लोकांसोबत ऑनलाइन जोडून दिले.
 जसजशी निवडणूक जवळ येत होती तसतशी कामाचा जोर वाढत होता. गाण्याला आता पुण्यातील सोनाल जोशींना रिपोर्ट करावा लागत होता. स्काईप, फेसबुक, व्हाट्सअप च्या सोशलच्या अभासी वातावरणामध्ये सगळेच मग्न झाले होते.
गणेश पीपळेकर, अत्यंत लाघवी स्वभावाचा, हुशार आणि मितभाषी तरुण, याअगोदर शहरामध्ये नोकरी करीत असतांना कामातील हुशारी, वक्तशीरपणा, प्रामाणिकपणा या गुणांमुळे त्याने सर्व ठिकाणी आपली छाप पडली होती, शहरामध्ये असतांना प्रचंड वाचन केले व वाचनामुळे लिखाणाची आवड निर्माण झाली. रुळलेल्या वाटेवर चालतांना फार कष्ट घ्यावे लागत नाहीत पण नवीन वाट निर्माण करायची असेल तर  खाच खळग्यातून मार्ग काढावा लागतो आणि हा मार्ग काढणाऱ्यांच खरा अर्थ कळतो अशी त्याची समाज होता. नेहमीच तो काहीतरी भन्नाट करण्याची कल्पना करीत असे, कल्पनेच्या लाटेवर तरंगत तरंगत तो विशाल सागरात विहार करीत असे आणि नेहमीप्रमाणे परिस्थिती त्याला वाकोल्या दाखवीत सप्न भंग करीत असे. म्हाताऱ्या आईवडीलांची जबाबदारी त्याच्यावर असल्याने आता त्याला शेती करण्याशिवाय पर्याय नव्हता. आता नोकरी करायची नाहीच जे काय करायचे ते शेतीतच, पण पावसाअभावी पडलेल्या दुष्काळामुळे त्याला पुन्हा नोकरी करावी लागत होती. अर्थात नोकरी तालुक्याच्या गावी असल्यामुळे त्याने ती पत्करली होती. गावाकडे जाण्यायेण्याची सोय नसल्यामुळे व्यवस्थापकाने त्याची रहायची व्यवस्था कामाच्याच ठिकाणी केली होती.
दिवस उजाडला आणि सुरु झाली ती कामाची धावपळ, लागलीच ऑफिसचा फोन खणाणला
“गणेशराव आहेत का..?” सोनल बोलली
“हो..बोलतोय..?” गणेश अडखळत उद्घारला.
गणेशराव मी तुम्हाला मेल केला आहे, तेवढा बघून घ्या आणि ज्या पोस्ट पाठविल्या आहेत त्या दुपारी १वाजेपर्यंत साहेबांच्या वेबसाईटवर अपलोड करा..! आणि पुढील सुचनासाठी स्काईपवर लॉगीन व्हा.. ”
सोनल अतिशय शांत व मृदूस्वरात सूचना करीत होती. गाण्याच्या भंगलेल्या खडकाळ हृदयामध्ये कर्णमधुर सुरांचा गुंजारव सुरु झाला होता.....!
गाण्याने सोनाल विषयी माहिती जाणून घेण्यासाठी सर्व सोशल नेटवर्कचा सहारा घेतला पण त्याला माहिती मिळू शकली नाही..
“श्रेयस सर, किती कर्मचारी आहेत हो तुमच्या कंपनी मध्ये” गणेश त्याच्या संगणकावर काम करीत असतांना बोलला.
“अकरा”
“लेडीज किती आहेत” शंकेची पाल चुकचुकू नये म्हणून गाण्याने मध्येच चहा पिणार का सगळेजण म्हणून विचारणा केली.
“गाणुभाऊ बिस्किटे पण मिळतील का?” अनिसने मिस्कीलपणे हासत विचारांना केली
“असू द्या फक्त चहाच मागवा” काकफळे उत्तरला.
गाण्याने श्रेयसला विचारलेला प्रश्न मात्र अनुत्तरीतच राहिला. सायंकाळ झाली तसी प्रत्येकाची घरी जाण्यासाठी घाई झाली. श्रेयसने त्याचे कॉम्पुटर बंद केले व सगळ्यांना ही आपापले कॉम्पुटर बंद करण्यास सांगितले.
गण्याने संध्याकाळी जेवण संपवून त्याच्या खोलीतील लाइट बंद करून झोपण्यासाठी स्वप्नांची शाल अंगावर पांघरली. डोळे मिटताच त्याला एक शुभ्र वस्त्रे घातलेली अतिशय सुंदर स्त्री दिसली बहुदा ती परी असावी..हो नक्की ती परीच होती...तीने त्याचा हात धरला होता. ती त्याला खेचत होती एका सुंदर दुनियाकडे ते वेगळेच होते..तेथे गुलाबाचे सुंदर फुले होती. त्यांच्या दरवळामुळे वातावरण प्रसन्न झाले होते. थोडे पुढे जाताच असंख्य भरजरीवस्त्रालंकारीत अतिशय सुंदर स्त्रिया त्या परीला वाकून अदबीने प्रणाम करीत होत्या. आणि गाण्याकडे आश्चऱ्यांनी बघत होत्या. ती बहुतेक ह्या सर्व पऱ्यांची राणी असावी....हो राणीच होती ती..आणखीन पुढे गेल्यावर एक भरजरी सिंहासन दिसत होते ती गाण्याला तसीच ओढत घेऊन जात होती..आता तिचा हात जरा सैल झाला होता...ती गाण्याला सिंहासनावर बसण्याचा हाताने ईशारा करीत होती...आणि अचानक मोठ्याने धड.. धड.. आवाज सुरु झाला गाण्या पार भांबावून गेला होता..तो कर्कश आवाज कसला होता.. छे ते तर त्याच्याच छातीचे ठोके होते. हे काय होत आहे मला असे महणून गण्या जोरात किंचाळायला लागला...कोणीतरी त्याला मागे ओढत होते... तो मागे खेचला जात होता..परी न जाण्याचा ईशारा करीत होती....तो चालला होता..सर्व पऱ्यांनी त्याला एकाबाजूने पकडले होते तरी देखील तो मागे खेचला जात होता....आता मागे खेचण्याचा वेग जास्त झाला होता. परीच्या हातातून त्याचा हात केंव्हाच निसटला होता......त्यांच्या डोळ्यासमोर काळाकुठ्ठ अंधार पसरला होता..अगदी काळाकुठ्ठ..!
सोनेरी सूर्य किरणाचे तिरीप गाण्याच्या खोलीमध्ये पडल्यामुळे खोली प्रकशमय झाली. गण्या उठला सकाळची सर्व कामे आटोपून घाईघाईने तो ऑफिस मध्ये पोहचला होता..
अनिस, काकफळे, श्रेयस सर्वजण माझ्या आगोदर आले होते. दिवस कसे भराभर चालले होते. निवडणूक उद्यावर येवून ठेपली होती. आजचा सगळ्यांचा कामांचा हा शेवटचा दिवस असणार होता.
“आज सर्वांनी आपल्या कामांचे विवरणपत्र तयार करून दुपारपर्यंत गणेशरावकडे सादर करा. आणि गणेशराव तुम्ही ते सोनल जोशींना मेल करा.” श्रेयसने सगळ्यांना सूचना दिल्या.
नेहमीप्रमाणे ऑफिसचा फोन खणाणला “ गणेशराव मी सोनाल बोलतेय, सर्वांच्या कामांचे सगळे विवरणपत्र माझ्या मेल वर पाठवा. आणि हो उद्या निवडणूक असल्यामुळे आज तुमच्या सगळ्यांचा कामाचा शेवटचा दिवस असेल...तुम्ही खूपच चांगली मदत केली..त्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून आभार..गणेशराव आमच्या कंपनीमध्ये काम केल्यामुळे मिळालेल्या अनुभवावर भविष्यामध्ये तुम्हाला खूप चांगली संधी मिळू शकते...किंबहुना आमच्याकडे एखादा परत अशाप्रकारचा प्रकल्प आल्यास आम्ही सगळ्यात आगोदर तुम्हालाच संधी देऊ हे नक्की..बाय द वे कीप इन टच..”
“ हो नक्कीच..संधी मिळाल्यास मला देखील तुमच्या सोबत...म्हणजे तुमच्या कंपनीसोबत काम करायला नक्कीच आवडेल.” आणि गाण्याने शेवटचा निरोप घेतल्याप्रमाणे फोन ठेवला.
तीन महिन्याच्या कालावधीमध्ये ऑफिसमध्ये सगळ्यांची एकमेकांना सोबत चांगली ओळख झाली होती.  आजचा सगळ्यांचा कामाचा शेवटचा दिवस असल्यामुळे ऑफिस मध्ये थोडे भावनिक वातावरण तयार झाले होते. सगळ्यांनी एकमेकांचा निरोप घेतला आणि जो तो आपापल्या मार्गाने घरी जाण्यासाठी निघाला. गाण्याने त्याचे कपडे बॅगमध्ये कोंबले, आणि सगळ्यांचा निरोप घेऊन झपाझप पाउले टाकत बसस्टँड च्या दिशेने चालू लागला. रोजच्या सारखी आज बसस्टँड गर्दी होती. कलकलाट होता पण त्याला त्यामध्ये काहीतरी बदल झाला असल्याचा भास झाला. इथे येतांना जी उम्मेद होती ती जातांना नव्हती..
गाण्याने गाडी पकडली आणि एका मोकळ्या सीटवर जाऊन बसला पंधरा मिनिटे डबल बेलच्या प्रतीक्षेत असलेली गाडी सुरु झाली गाडीच्या चाके वेग धरू लागली आणि गाण्याच्या डोक्यातील विचारही..
माणसाच्या जीवनाला भावनेची किनार लाभली असल्यामुळे माणसांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण होतो...आणि दुखःही..या दुनियामध्ये किड्यामुंग्याप्रमाणे हजारो लोकं जीवन जगात असतात, जीवनासाठी धावपळ करीत असतात...आणि जगण्याच्या या शर्यतीत कोणाचा तरी सहवास लाभतो, आणि नकळत त्या सहवासाचा त्याला त्याच्या नकळत सवय जडते आणि शेवटी एक वेळ अशी येते की त्याला तो सहवास अनिच्छेने सोडवा लागल्यामुळे असह्य वेदना होत असतात. क्षणभर आपणाला एखाद्या व्यक्तीची ओढ लागते, आता त्याच्या किंवा तिच्या शिवाय जगूच शकत नाही असे वाटते...पण हे सुद्धा बदलणार असते जसजशी वेळ पुढे सरकते तसतशी ह्या आठवणीची ठिगळे सुद्धा गळून पडतात....जीवनाचा गाडा हाकण्यासाठी संघर्ष हा कायम असतो...पुन्हा एक नवीन जाहिरात असते...नवीन नोकरी...आणि नवीन सहकारीही..!

No comments:

Post a Comment