Friday 1 July 2016

लोक कलावंत उपेक्षितच



 महाराष्ट्राला प्राचीन काळापासून अनेक परंपरा लाभलेल्या आहेत. शाहिरी, गोंधळी, भारुड तमाशा कीर्तन, बहुरूपी वाघ्या मुरळी, यासारख्या अनेक लोक कलांनी महाराष्ट्राची साहित्य परंपरा एका विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवण्याचे काम केले आहे. मराठी साहित्य परंपरेत अण्णाभाऊं साठेंनी जवळजवळ सर्वच महत्त्वपूर्ण साहित्यप्रकार अत्यंत प्रभावीपणे हाताळला. कविता, लावण्या, शाहिरी, वग, लोकनाटय़ांपासून कथा, कादंबरी, प्रवास वर्णनात्मक लेखनापर्यंत. त्यांनी आपल्या साहित्यातून निर्माण केलेले नायक विपन्नावस्थेत असूनसुद्धा लाचार ठरत नाही. तर अत्यंत दणकट जीवन व्यक्त करतात. या लोक पारंपरेतूनच पूर्वी समाज प्रबोधन केले जात असे, ग्रामीण भागात यात्रा उत्सवा दरम्यान कीर्तन, नाटक वाघ्या मुरळीचे कार्यक्रम सादर होत असतात. आणि यामधूनच ग्रामीण भागातील कलाकारांना आपल्यातील सुप्त गुणांना पैलूं पाडण्यासाठी व्यासपीठ निर्माण होते. ग्रामीण भागामध्ये आजही कीर्तनकार कीर्तनाच्या माध्यमातून समाज घडविण्याचा प्रयत्न करतात पण असल्या कार्यक्रमाना ज्येष्ठांचीच उपस्थिती असते तरुण वर्ग याकडे फार मोठ्या प्रमाणात सहभागी होताना दिसत नाहीत. नक्कीच याला आधुनिक जीवनशैली कारणीभूत असू शकते त्यामुळेच दान पावलं हो दान पावलं म्हणत भल्या सकाळीच शुद्ध आचरणाचा निस्वार्थ दानाचा आणि हरी भजनाचा उपदेश करणारा वासुदेव आज क्वचितच कधीतरी दिसतो. गावाकडच्या तमाश्यांच्या फडातील कलाकारांचे भवितव्य देखील अंधारमयच आहे. मौखिक परंपरेने चालत आलेली गाणी, अभंग, ओव्या, गवळणी आपल्या विशिष्ट लकबीत तालबद्ध रीत्या सादर करून एकप्रकारे समाज प्रबोधन करण्याचे काम हे कलावंत करीत असतात. आजच्या परिस्थितीत मात्र ह्या सर्व लोककला अखेरच्या घटका मोजीत आहेत असे म्हणायला हरकत नाही. शालेय विध्यार्थांच्या अभ्यासात पोवाडे, लोककलेविषयीचे साहित्य, बहिणाबाईच्या कविता, समाविष्ठ करून विध्यार्थांना त्याचे महत्त्व पटवून दिल्यास तो एक लोककला पुनरुज्जीवन मार्ग ठरू शकतो. आधुनिकतेच्या, शहरीकरणाच्या विळख्यात गुरफटत चाललेल्या अशा समाजाचा संस्कारक्षम परंपरकडे पाहण्याचा दृष्टीकोन मालिन होऊ नये यासाठी शासकीय व सामाजिक स्तरावरून सहकार्याची अत्यंत आवश्यकता आहे. सध्या सोशल मिडीयामध्ये हॅश टॅश वापरून इव्हेंट ट्रेंड निर्माण केले जातात. याच माध्यमातून फेसबुक, ट्विटर यासारख्या सोशल नेटवर्क साइट्सवर तरुणांनी हॅश टॅश वापरून इव्हेंट ट्रेंड निर्माण केल्यास यासंबंधी समाजामध्ये जाणीव जागृती होऊ शकते. नावीन्यतेची कास धरावी पण इतिहासाचा संग्रह देखील असावा तरच ही कला आणि लोककलावंत तग धरू शकेल एवढे माञ नक्की....!

No comments:

Post a Comment