Sunday, 20 November 2016

औरंगाबाद येथे नोकर भरती मेळावा

देवगिरी महाविद्यालय औरंगाबाद येथे दिनांक १ डिसेंबर २०१६ रोजी जिल्हा व्यवसाय व प्रशिक्षण विभागातर्फे व्यवसाय शिक्षण घेऊन उत्तीर्ण झालेल्या विध्यार्थ्यांसाठी भारती मेळावा आयोजित केला आहे. सदरील मेळावा हा जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालय औरंगाबाद, देवगिरी महाविद्यालय, बोर्ड ऑफ अॅप्रेंटीस ट्रेनिंग मुंबई,सीएमआय औरंगाबाद,मसीआ औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला आहे. ग्रामीण भागातील विध्यार्थ्यानी जास्तीत जास्त लाभ घ्यावा.(सदरील माहिती ही दैनिक सांजवार्ता दिनांक २० नोव्हेंबर २०१६ रोजीच्या वृत्तपत्रातील बातमीच्या आधारे देलेली आहे.)

Monday, 14 November 2016

शेत मालाला योग्य भाव हवा.


सततचा पडणारा दुष्काळ, अतिवृष्टी यामुळे शेतकरी कायम चिंताग्रस्त असतो पण चालू वर्षी पाऊस चांगला झाल्यामुळे शेतकरी वर्गात कमालीचा आनंद व्यक्त होत आहे. निसर्गाने या वर्षी साथ दिल्यामुळे शेतकऱ्यांचा मालाचे उत्पादन वाढणार आहे. कपाशी, मक्का, सोयाबीन, तूर आदी पिके मोठ्या कष्टाने शेतकऱ्याने जोपासले आहे. शासनाने शेतकऱ्याच्या मालास योग्य भाव दिल्यास तेंव्हाच खऱ्या अर्थाने मेहनतीचे चीज होईल असे म्हणता येईल. शेती हा आपल्या अर्थव्यवस्थेचा काणा आहे, कोणताही राजकीय पक्ष असो त्या पक्षाचे नेते निवडणुकीच्या काळात शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव वाढवून देऊ अशी आश्वासने देऊन निवडून येतात आणि सत्ता आली की त्यांना त्यांच्या आश्वासनांचा विसर पडतो. शेतकऱ्यांची केवळ अनुदानावर बोळवण न करता शेतीसाठी ठोस उपाय योजना  करून शेतकऱ्यांसाठी विविध योजना अंमलात आणाव्यात त्याचप्रमाणे शासकीय स्तरावर शेतीविषयक विविध चर्चासत्रे, प्रात्याक्षिके, कार्यशाळा असे कार्यक्रम आयोजित करून राबविल्यास सदैव आर्थिक विवंचनेत गुंतत चाललेला शेतकरी खऱ्या अर्थाने उभारी घेऊ शकेल यात शंका नाही. 
( या लेखामध्ये संदर्भासाठी दिनांक १४ नोव्हेंबर २०१६ रोजी प्रकाशित झालेल्या दैनिक सकाळ वृत्तपत्रातील औरंगाबाद टुडे या पुरवणीतील कात्रणाचा उपयोग केला आहे) 

Monday, 17 October 2016

सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी सुवर्ण संधी.

जिल्हाउद्योग केंद्र जालना यांच्या मार्फत सन २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठीसाठी जालना जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना नवीन उद्योग व्यवसाय सुरु करण्यासाठी सुधारित बीजभांडवल योजनेतर्गत अर्ज मागविण्यात येत आहेत. गरजू आणि होतकरू तरुणांनी याचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी संबधित व्यक्तीकडे बातमी वाचून सखोल चौकशी करावी.

Saturday, 8 October 2016

शंकेखोर प्रवृत्तीचे सर्जिकल व्हावे..!

भारतीय लष्कराने केलेली सर्जिकल स्ट्राईक्सची कृती अपरिहार्य आणि अनिवार्य होती पाकिस्तानच्या मुजोरीचा तो एकप्रकारे मुहतोड जवाब होता. याबाबत सध्या भारतामध्ये राजकीय वादळ निर्माण होत आहे, अशा मुद्द्यावर बोलताना राजकीय नेत्यांनी थोडे तारतम्य बाळगायला हवे. राजकीय कंडू शमविण्यासाठी सर्जिकल स्ट्राईक बाबत पुरावे मागून लष्करालाच खोटे ठरविणे ही मनोवृत्ती भारतीय लष्कराच्या निष्ठा व विश्वासहर्तेला सुरुंग लावणारी आहे. आंतरराष्ट्रीय राजकारण, आंतरराष्ट्रीय संबध, देशांतर्गत परिस्थिती, शेजारी देशाशी असलेले संबध व देशाची संरक्षक विषयक भूमिका या सर्वांच्या विचार करता सगळ्याच गोष्टी जगजाहीर करता येत नसतात. आणि हे आम्हीच केले असे म्हणून उगाच कोणी डांगोराही पिटून सर्जिकल स्ट्राईक बाबत श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये राजकारणी लोकांना राजकारण करायला फक्त मुद्दा हवा असतो, मग ते नेते सत्ताधारी पक्षातले असोत की विरोधक. भारताची एकता अबाधित राखण्यासाठी अशा राष्ट्रीय मुद्द्याविषयी एकमेकांवर चिखलफेक केल्यापेक्षा सर्वांनी ह्या मुद्द्यावर न बोलणेच योग्य ठरेल..! बाकी राहिला मुद्दा जनतेच्या हिताचा, तर त्यासाठी शेतकरी आत्महत्या, दारिद्र्य निर्मुलन, पाणी टंचाई, वाढती लोकसंख्या, बेरोजगारी ह्या मुद्द्यावर देखील बोला ना, पण मात्र अशा राष्ट्रीय मुद्द्यावर बोलून ‘आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी’ असे वागणे म्हणजे खरी गरज आहे ती तुमच्या असल्या शंकेखोर विचार करण्याच्या प्रवृतीचे सर्जिकल करण्याचे..!.

Wednesday, 28 September 2016

कोळेगाव जि. प. शाळेस जाळ्या भेट.

भोकरदन तालुक्यातील कोळेगाव येथे कै. लीलाबाई व्यायाम शाळेतर्फे कोळेगाव जिल्हा परिषद शाळेस वृक्ष संरक्षण जाळ्या भेट देण्यात आल्या. झाडे लावा झाडे जगवा’ हे घोष वाक्य खऱ्या अर्थाने कृतीत उतरविले आहे ते कोळेगाव येथील नवतरुण माजी सरपंच पंडितराव गावंडे यांनी. कोळेगाव येथील शाळेत विदयार्थी संख्या वाढावी व विद्यार्थ्यांचे शिक्षणातील स्वारस्य वाढावे यासाठी शाळेत आकर्षक रंगरंगोटी केलेली आहे. त्याच प्रमाणे शाळेच्या परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले आहे. सदरील लावलेल्या झाडांना संरक्षण जाळ्या असल्यास झाडांना नुकसान होणार नाही या कल्पनेतून आणि ज्या शाळेत आपली पाल्य शिकताहेत त्या शाळेसाठी आपलेही काही देणे लागते या भावनेतून पंडितराव गावंडे यांनी स्वखर्चातून लोखंडी जाळ्या शाळेस भेट दिल्या आहेत. केवळ शासकीय मदतीवर अवलंबून न राहता प्रत्येकांनी शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी शक्य होईल तेवढी मदत करावी असे आवाहन यावेळी माजी सरपंच पंडितराव गावंडे यांनी केले आहे. यावेळी शिक्षक नागने सर, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष सुनील गावंडे, अंकुश गावंडे, शांताराम गावंडे, सांडू गावंडे, भाऊसाहेब गावंडे आदींची उपस्थिती होती.

Tuesday, 13 September 2016

सत्याचा आवाज दाबला जाऊ नये.

मुंबई महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी पाच लाखाची लाच मागितल्या प्रकारी ‘विनोदवीर’ कपिल शर्माने उगाच वाद ओढवून घेतला. पण या प्रकरणाची दुसरी बाजूही लक्षात घेणे आवश्यक आहे, की पंधरा कोटी रुपये कर भरून देखील कोणी लाच मागत असेल तर आपल्या समाजाला कीड नव्हे भयंकर रोग झाला आहे. निर्भीडपणे नरेंद्र मोदींनाच ट्विट काल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी दखल घेणे अपेक्षितच होते पण कोणताही पुरावा नसताना एखाद्यावर आरोप करणे ही नक्कीच अपमानास्पद बाब आहे. आपला समाज हा कलाकारांचे अनुकरण फार करतो कपिल शर्मा हा प्रसिद्ध कलाकार असल्यामुळे त्यानेही आपण काय बोलतो कसे वागतो याचा थोडा विचार करायला हवा आणि समजा  खरेच कोणी लाच मागितली असेल आणि संबधित अधिकाऱ्याचे नाव केवळ राजकीय दबावामुळे तो सांगत नसेल तर ही एकप्रकारची दडपशाही ही असू शकते. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत त्यामुळे कपिलच्या या वक्त्यव्याने राजकारण्यांना आयतेच कोलीत मिळाले आहे. एखाद्या कामासाठी शासकीय कर्मचाऱ्याकडून लाच मागणे हा जसा गुन्हा आहे तसाच बेकायदा बांधकाम करणे, तिवरांची झाडे तोडणे हा देखील गुन्हाच आहे पण मुंबई नगर पालिकेने आत्ताच कापील शर्मा विरुद्ध गुन्हा दाखल करणे हे संभ्रम मिर्माण करीत आहे. आपल्यावर जर खरोखरच अन्याय होत असेल तर आवाज उठवायलाच हवा..किंवा जर कोणी त्याविरुद्ध आवाज उठवीत असेल तर त्याला पाठींबा तरी द्यायला हवा फक्त तो आवाज निष्पक्ष हवा..! 

Sunday, 4 September 2016

मिरचीचा 'हिरवा चिखल' न होवो.!


मागील दोन वर्षापासून मिरची ह्या पिकावर रोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव  असल्यामुळे परिणामी मिरचीने भावाचा नवीन उच्चांक गाठला. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे ह्या वर्षी मिरचीची लागवड मोठ्या प्रमाणात झाली. आणि जे अपेक्षित होते तेच झाले. चौदा रुपये प्रति किलो विकली गेलेली मिरची आज पाच रुपये प्रती किलो या भावाने विकली जात आहे. व्यापारी वर्गाकडून एक प्रकारे शेतकऱ्यांना वेठीस धरले जात आहे. जिवाची तम न बाळगता शेतकरी रात्रंदिन अपार कष्ट करतो तेंव्हा कुठे पीक त्याच्या हाती लागते. पण एवढे करूनही शेतकरी मार खातो ते मार्केटिंगमध्ये, सर्वच बाबतीत सरकार शेतकऱ्यांची मदत करू शकणार नाही. त्यामुळे 'ट्रेंड' बघून शेतकऱ्यांनी आपापल्या पिकांचे नियोजन केल्यास आज मिरचीची जी परिस्थिती आहे त्यासारखी परिस्थिती निर्माण होणार नाही. अर्थ शास्त्राच्या मांगणी आणि पुरवठा हा सिद्धांतही लक्षात घेणे आवश्यक आहे. एखाद्या पिकाला जर चांगला बाजार भाव मिळत असेल तर सर्वांनीच  त्याकडे वळणे योग्य ठरणार नाही कारण उत्पादन जास्त झाले कि बाजार भाव आपोआपच कमी होतात. केवळ एकाच पीक न घेता वेगवेगळ्या प्रकारची पिके शेतकऱ्यांनी घेतल्यास जेणे करूनएखाद्या शेत मालास भाव कमी मिळाल्यास दुसऱ्या पिकातून त्याची भरपाई करता येइल. याचप्रमाणे शेतमालाच्या मार्केटिंगचा अभ्यास करून पिकांचे नियोजन केल्यास याचाही शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल. सध्यातरी मिरचीने शेतकऱ्यांना ठसका लावला आहे, त्याचा 'हिरवा चिखल' न होवो एवढीच अपेक्षा...!